मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अशावेळी मोठया मंडळींसह छोटी मंडळीदेखील घरी बसून कंटाळाली आहेत. घरबसल्या ज्ञानात भर पडावी. आपल्या आवडत्या विषयाची माहिती सहज मिळावी म्हणून अनेक संस्थांनी अनेक उपक्रम हाती घेतली आहेत. अशाच अनेकांपैकी एक असलेल्या आणि विज्ञानाशी निगडीत असलेल्या वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्राने खगोलशास्त्राची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला असून यासाठी व्हॉटसअॅपसह टेलिग्रामचा आधार घेतला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातील खगोलतज्ज्ञ सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.खगोलशास्त्र म्हणजे नेमके काय? आकाशगंगा, ग्रह, तारे यांचा अभ्यास कसा करायचा. आकाश निरिक्षण कसे करायचे. कोणत्या वेळी करायचे. त्यापूर्वी कोणाची कशी मदत घ्यायची, इत्यादी बाबतची माहिती या माध्यमातून दिली जात असल्याचे वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्राच्या शिक्षण सहाय्यक शीतल चोपडे यांनी सांगितले. याकरिता केंद्राच्या वतीने किमान दहा ते बारा व्हॉटस अॅप ग्रुप बनविण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय येथे काही मर्यादा येत असल्याने टेलिग्रामची मदत घेण्यात आली. केंद्राच्या ग्रुपवर आॅस्टेÑलियासह देशातील तज्ज्ञ सहभागी आहेत. ग्रुपवर सहभागी लोकांकडून येथे खगोलशास्त्राशी संबधित माहिती, प्रश्न विचारले जातात. याची उत्तरे तज्ज्ञांकडून येथे दिली जातात. येथे काही तांत्रिक अडचणी असल्याने शीतल चोपडे येथील सर्व प्रश्न एकत्रित करतात. प्रश्न एकत्रित केल्यानंतर त्याची उत्तरे तज्ज्ञ मंडळीकडून घेतली जातात. आणि टेलिग्रामच्या माध्यमातून उत्तरे उपलब्ध करून दिली जातात. गेल्या दिड एक वर्षांपासून हा उपक्रम सुरु असला तरीदेखील गेल्या महिन्याभरापासून यास आणखी वेग आला आहे.आकाशदर्शनासह उल्लेखनीय उपक्रम या माध्यमातून हाती घेतले जातात. सुर्यमाला, सुर्य, ग्रहांची स्थिती, तारे, आकाशगंगा, पृथ्वी, मंगळ याशी निगडीत अनेक प्रश्न विचारले जात असून, या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जात आहे. याव्यतीरिक्त प्रश्नौत्तरे (क्वीझ प्रोगाम), आकाश दर्शन, ग्रहांची माहिती असे अनेक उप्रकम आयोजित केले जात असून, याची अधिकाधिक माहिती इच्छूकांना दिली जात आहे.
चला विज्ञानाची सफर करूया : चंद्र, ग्रह, तारे आणि बरचं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 7:04 PM