कोठडीतील मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई करू
By admin | Published: April 5, 2015 01:01 AM2015-04-05T01:01:51+5:302015-04-05T01:01:51+5:30
मालवणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत संशयित मृत्यू झालेल्या हरी बिरबल चौहान प्रकरणी पारधी समाजाचे अध्यक्ष रामू काळे यांनी आज पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली.
मुंबई : मालवणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत संशयित मृत्यू झालेल्या हरी बिरबल चौहान प्रकरणी पारधी समाजाचे अध्यक्ष रामू काळे यांनी आज पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली. तेव्हा दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मारियांनी काळेंना दिले.
दोषींना कडक शिक्षा करेपर्यंत आम्ही चौहान यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा पारधी समाजाने दिला होता. त्यानुसार आज काळे यांनी दुपारी बाराच्या सुमारास मारियांची भेट घेतली. तेव्हा
चौहान यांचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आम्हाला मिळालेला नाही. त्या अहवालानुसार जर कोणी
दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू, असे आश्वासन मारिया यांनी दिल्याचे काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले. त्यानुसार आज
सायंकाळी आम्ही चारकोप नाका परिसरातील स्मशानभूमीत चौहान यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचेही ते म्हणाले.
चौहान यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सकाळी मालवणी पोलीस ठाण्याच्या कोठडीत सापडला. त्यांना एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी बुधवारी रात्री त्यांच्या मालवणीमधील अंबुजवाडी परिसरातील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौहान यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी, कोठडीत केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप घरच्यांनी केला होता. या घटनेनंतर मालवणी परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. ते आता निवळू लागल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.