या रे या, सारे या, पुलांबाबत बोलू या!, ‘एमआरव्हीसी’चे विशेष चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:37 AM2017-11-10T01:37:53+5:302017-11-10T01:38:03+5:30
एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांच्या निर्मितीला प्राथमिकता देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले
मुंबई : एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांच्या निर्मितीला प्राथमिकता देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे (एमआरव्हीसी) विविध रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात येतील. शक्य त्या पादचारी पुलांवर सरकते जिनेही बसविण्यात येणार आहेत. त्यानिमित्त पुलांबाबत हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी एमआरव्हीसीने १० नोव्हेंबर रोजी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात एमआरव्हीसी, रेल्वे, लष्कर यांचा समावेश आहे.
करी रोड, एल्फिन्स्टन रोड आणि आंबिवली स्थानकात लष्कराकडून पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.
सद्य:स्थितीत उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी फलाटांचे विस्तारीकरण, फलाटांवर छप्पर उभारणे, आरओबी आणि एफओबी उभारणे, रेल्वे रूळ पार करू नयेत यासाठी बॅरिकेट्स, सुरक्षात्मक अन्य उपाय अशी कामे सुरू आहेत. भविष्यात पादचारी पूल उभारणीसाठी नावीन्यपूर्ण कल्पनांसह नव्या डिझाइनमध्ये कमीतकमी वेळात हे पूल तयार व्हावेत, यासाठी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी एमआरव्हीसीतर्फे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात पादचारी पुलांसंदर्भात हरकती आणि सूचना देण्यास इच्छुक असणाºया सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केले आहे.
आॅनलाइन पद्धतीने कल्पनांचा स्वीकार
एमआरव्हीसीतर्फे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारताना, ओव्हर हेड वायरची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानुसार, सर्व कल्पना आणि सूचना समजावून घेत, योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी पूल उभारताना करण्यात येणार आहे.
पादचारी पुलांच्या हरकती आणि सूचना ‘ई-मेल’वरदेखील स्वीकारण्याची तयारी एमआरव्हीसीने केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.