चला कृषिक्षेत्राकडे वळू या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:14 AM2018-06-16T05:14:53+5:302018-06-16T05:14:53+5:30
आता पारंपरिक कृषिव्यवसाय कात टाकत आहे. यात नवनवीन कार्यक्षेत्रे निर्माण झाली आहेत. म्हणून अभियांत्रिकीकडे जेवढे विद्यार्थी वळतात त्यापेक्षा जास्त विद्यार्थी कृषी अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. याला सरकारचे सकारात्मक कृषिधोरणही कारणीभूत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत.
भारत हा प्राचीन काळापासून कृषिप्रधान देश आहे. आजही आपली अर्थव्यवस्था कृषिक्षेत्रावर टिकून आहे. एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा आपला देश आता आपली सव्वाशे कोटी जनतेच्या अन्नाची गरज भागवून अन्नधान्य निर्यात करतो आहे. यात कृषिक्षेत्रातील बदलाचा फार मोठा वाटा आहे. कारण आता पारंपरिक कृषिव्यवसाय कात टाकत आहे. यात नवनवीन कार्यक्षेत्रे निर्माण झाली आहेत. म्हणून अभियांत्रिकीकडे जेवढे विद्यार्थी वळतात त्यापेक्षा जास्त विद्यार्थी कृषी अभ्यासक्रमाकडे वळत आहेत. याला सरकारचे सकारात्मक कृषिधोरणही कारणीभूत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत.
कृषिउद्योग म्हणजे शेती करणे नव्हे. या क्षेत्रातही अनेक कंगोरे आहेत. उदा. प्लान्ट पॅथोलॉजिस्ट, ब्रीडर, अॅग्रो मीटरोलॉजिस्ट, बॉटनिस्ट, बॅक्टोरिओलॉजिस्ट, सॉईल केमिस्ट, सीड रिसर्चर अशी किती तरी क्षेत्रे यात आहेत. पण त्यासाठी शेती विषयातून पदवीधर होणे गरजेचे आहे. कृषिक्षेत्रात किंवा उद्योगात वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ, मार्केटिंग क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आहेच. त्यात अन्न उत्पादन, अन्नप्रक्रिया, धान्य-बी-बियाणांवरील प्रक्रिया, कापड उद्योग, खतनिर्मिती, कीटकनाशके निर्मिती, पशुखाद्यनिर्मिती यांचा समावेश होतो. शेतकी अभियांत्रिकी हे क्षेत्रदेखील रोजगार मिळवून देणारे आहे. या अंतर्गत शेती करण्याच्या पद्धतीत सुयोग्य बदल घडवून आणण्याप्रमाणेच शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, वीजनिर्मिती, जमीन व पाणी यांचे रक्षण यांचाही अंतर्भाव केलेला आढळतो. राज्याच्या कृषी खात्यात अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आॅफिसरची नोकरी मिळू शकते. अर्थात ही जागा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे भरली जाते.
एवढेच नव्हे तर आजकाल मोठमोठे पंचतारांकित हॉटेल्स, रिसॉर्ट, हेल्थ फार्म उभारले जातात. लोकांकडे पैशाची आवक वाढल्याने थोड्याशा विसाव्यासाठी तेथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना नेत्रसुखद असा जो परिसर हवा असतो तो तयार करण्याचे काम लँडस्केपर्स आणि हॉर्टिकल्चरिस्ट करीत असतात. इंडियन कौन्सिल आॅफ अॅग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेमधून विद्यार्थी संशोधनातही करिअर करू शकतात. ते शेती संशोधक बनू शकतात. खासगी उद्योगक्षेत्रातही रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळू शकते. शेती हा असा प्रांत आहे की त्याची मागणी कधीच कमी होणार नाही. त्यामुळे या विषयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते.
आता कृषिक्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युवावर्ग यात क्रांती घडवून आणू शकतो. नवीन संकल्पना राबवून त्या अमलात आणू शकतो.
जागतिकीकरणामुळे आजकाल फळे आणि फुले निर्यातीत भारताला मोठी संधी आणि बाजारपेठ आहे. भारताकडे शेती उत्पादनाच्या निर्यातीची खूप क्षमता आहे. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारताशी व्यवहार करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे हे क्षेत्र सहसा मागे पडणार नाही. म्हणूनच भारत सरकारचे कृषीविषयक धोरणही सकारात्मक आहे. त्याचा फायदा तरुणांना करून घ्यायला काहीच हरकत नाही.
शेती विषयातून पदवीधर झाल्यानंतर उमेदवार अनेक आस्थापनांतून फिल्ड आॅफिसर, ग्राम विकास अधिकारी या पदावर नियुक्त होऊ शकतात. अनेक महामंडळे, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, स्टेट फार्म कॉर्पोरेशन, वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन, फूड कॉर्पोरेशन येथेही कृषिशिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची संधी असते. बियाणे कंपन्यांतही बियाणे अधिकारी बनू शकतात किंवा पुढे संशोधनही करू शकतात. याशिवाय, फार्म मॅनेजमेंट, लँड अप्रेजल, ग्रेडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग या खासगी क्षेत्रातही ते करिअर करू शकतात.