मुंबई : यंदा दोन वर्षानंतर वांद्रे पश्चिम परिसरात माऊंट मेरी यात्रा होणार असून, या यात्रेला दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या अनुषंगाने महापालिकेतर्फे नागरी सेवा सुविधांबाबत तयारी करण्यात आली आहे. यंदा प्रथमच युट्युब, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांद्वारे या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.
वांद्रे (पश्चिम) येथे शतकाहून अधिक परंपरा व वारसा लाभलेली आई माऊंट मेरीची यात्रा यंदा ११ ते १८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. कोविड या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. चर्च ऑथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी प्रतीदिन साधारण १ लाख भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येतील. भाविकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिसरातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांच्या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
वाहनांची गर्दी टाळण्यासाठी व सुरक्षित पार्कींग व्यवस्थेसाठी खाजगी संस्थांना त्यांच्या ताब्यातील मोकळी जागा, शाळांची मैदाने (सुट्टीच्या दिवशी), डेपो उपलब्ध करुन देण्यास विनंती करण्यात आली आहे. जेणेकरुन वाहतुक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी पार्कींगची व्यवस्था होऊन रहदारीला बाधा येणार नाही.
उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे पूजेचे साहित्य, खेळणी इत्यादींच्या विक्रीसाठी माऊंट मेरी रोड, सेंट दि जॉन बॅप्टीस्टा रोड व केन रोड या ठिकाणी तात्पुरत्या पिचेसची लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन सामान्य जनतेस व स्थानिक नागरीकांना या तात्पुरत्या जागा यात्रेच्या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
आपत्तीजनक परिस्थिती टाळण्यासाठी संस्थेच्या आवारात कोणताही ज्वालाग्रही पदार्थ, गॅस सिलेंडर्स, अनधिकृत स्टॉल्स इत्यादी अवैध धंदयांना थारा देऊ नये असे आवाहन करण्यात आलेले आहे.
- परिसराच्या देखरेखीकरीता १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. - भाविक हे या परिसरात पायी चालतात, त्यामुळे रस्त्यांची देखभाल - दुरुस्ती करण्यात आली आहे.- भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.- घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत.- ओल्या सुक्या कच-याची विल्हेवाट व्हावी, यासाठी या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.- फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.- अनधिकृत स्टॉल्स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्जाव आहे. - प्रथमोपचार कक्ष उभारण्यात आला आहे.- देखरेख कक्ष व निरिक्षण मनोरा उभारण्यात आला आहे.- अग्निशमन दलाद्वारे बंब तैनात ठेवण्यासोबतच अग्निशमन दलासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.- बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.- सूचना देण्याच्या दृष्टीने ध्वनी क्षेपकांची व्यवस्था आहे.- तीन एलईडी स्क्रीन असून त्या द्वारे दर्शन असणार आहे.