मुंबई : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली ओढ सप्टेंबरचा पहिला आठवडा सुरू झाला तरी कायम आहे. पिके करपू लागल्याने राज्याच्या विविध भागातून विशेषत: मराठवाड्यातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांनुसार सरकारला सप्टेंबर अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ जाहीर करता येणार नाही. सप्टेंबरमध्ये वरुणराजाची कृपा होऊन राहिलेली तूट भरून निघेल, अशी आशा अजूनही बाळगली जात आहे.
दुष्काळ, अतिवृष्टीच्या काळात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत व पुनर्वसन विभागाकडून त्यासाठीची मदत जाहीर केली जाते. त्यानुसार मागील अतिवृष्टीच्या काळातील मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सध्या राज्याची परिस्थिती पाहता पावसाने ओढ दिली असली तरी दुष्काळ मात्र जाहीर करता येणार नाही. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत किती आणि कोणत्या भागात पाऊस पडतोय हे पाहावे लागेल. तसा पाऊस ज्या जिल्ह्यांत हाेणार नाही त्याचा आढावा सप्टेंबरअखेर घेतला जाईल. त्यानंतर ऑक्टोबरअखेरीस तशी परिस्थिती असल्यास तालुकानिहाय दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो, असे मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ८९ टक्के पाऊस झालाय. मागील वर्षी याच कालावधीत सरासरीच्या १२२.८ टक्के इतका पाऊस झाला होता.ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यातील तब्बल १५ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के इतका पाऊस झालाय. १३ जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के, तर सहा जिल्ह्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालाय. नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतील ४१ महसूल मंडलांत पाऊस झालेला नाही.
दुष्काळ कधी जाहीर केला जातो?राज्यातील एकूण लागवड क्षेत्र, पर्जन्यमान आणि आणेवारी आदी निकष तपासून बघितले जातात. जून-जुलैमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास व संपूर्ण पावसाळ्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता असते.