‘त्या’ कंत्राटदाराच्या नावाने तक्रारीचे पत्र व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:07 AM2021-06-16T04:07:36+5:302021-06-16T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चांदिवली भागातील आमदार दिलीप लांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला चिखलात बसवून कचऱ्याने आंघोळ घातल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चांदिवली भागातील आमदार दिलीप लांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला चिखलात बसवून कचऱ्याने आंघोळ घातल्यानंतर सोमवारी संबंधित कंत्राटदाराच्या नावाने पत्र व्हायरल झाल्याचे समजते. यात, लांडे यांच्यावर कारवाई केली नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांकडे अशी कुठली तक्रार आलेली नसून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
योग्य नालेसफाई न झाल्याने कमानी परिसरात पाणी साचत होते. कंत्राटदाराला बोलावले पण तो दोन तास झाले तरी आला नाही. त्यामुळे त्याला शिवसैनिकांनी शोधून नाल्याजवळ आणले आणि रस्त्यावरील कचऱ्यात व घाणेरड्या पाण्यात बसवले. त्याच्या अंगावर कचरा ओतला, अशी माहिती लांडे यांनी दिली होती. याचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियासह राजकीय मंडळीकडून टीकेची झोड उठली. सोमवारी यातील तक्रारदाराच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले. लांडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करा अन्यथा आत्महत्या करू असे यात नमूद करण्यात आले होते. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना ही विनंती करण्यात आली होती.
याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांना विचारले असता, अद्याप पोलिसांकडे अशी कुठलीही तक्रार आलेली नाही. तसेच व्हायरल झालेल्या पत्रातील क्रमांकावरून आम्ही संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र तो क्रमांकही बंद आहे. हे पत्र खरे की खोटे आहे याबाबत अधिक तपास करत आहोत. तसेच तक्रारदार पुढे आल्यास तात्काळ गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
-------------------------------