मुंबई : नागरी निवारा वसाहतीमध्ये गर्दुल्ले व चरसी यांचा उपद्रव वाढत असल्याने त्याचा त्रास वसाहतीमधील नागरिकांना होत असून, याबाबत ठोस कारवाई करण्याचे पत्र परिषदेने दिंडोशी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक धरणेद्र कांबळे याना देण्यात आले.
नागरी निवारा परिषद ही ६.२ एकरवर पसरलेली निवासी वसाहत आहे. वसाहतीमध्ये अनेक आरक्षित जागा आहेत, त्या ठिकाणी रहदारी कमी असते आणि प्रत्येक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था देणे शक्य होत नाही. वसाहतीमध्ये सध्या गर्दुल्ले, चरसी व दारुडे यांचा उपद्रव वाढला असून त्याचा त्रास या भागातील नागरिकांना होत असल्याचे लेखी पत्र नागरी निवारा परिषदेने नुकतेच दिले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी अमित नेवरेकर, मुकुंद सावंत व जोशी उपस्थित होते. पोलिसांची गस्त या ठिकाणी वाढवावी अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे. याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेद्र कांबळे यांनी नागरी निवारा परिषदेला दिले.