डबल डेकरसाठी चार कंपन्यांना पत्र

By admin | Published: June 22, 2016 03:54 AM2016-06-22T03:54:39+5:302016-06-22T03:54:39+5:30

प्रवासी क्षमता वाढवतानाच एसटीचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने एसटी महामंडळाकडून डबल डेकर बस प्रवाशांच्या ताफ्यात आणली जाणार आहे

Letter to four companies for double decker | डबल डेकरसाठी चार कंपन्यांना पत्र

डबल डेकरसाठी चार कंपन्यांना पत्र

Next

मुंबई : प्रवासी क्षमता वाढवतानाच एसटीचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने एसटी महामंडळाकडून डबल डेकर बस प्रवाशांच्या ताफ्यात आणली जाणार आहे. मात्र एसी डबल डेकर बस भारतीय कंपन्यांकडे नसल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. महामंडळाकडून सध्या चार कंपन्यांशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडे जवळपास १७ हजार बसेस आहेत. यात सेमी, साध्या, मिडी बसेसबरोबरच एसी बसचाही समावेश आहे. महामंडळाने नुकत्याच स्वत:च्या मालकीच्या ७0 एसी बसेस विकत घेतल्या, तर आणखी ५00 बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून त्यादेखील लवकरच ताफ्यात येणार आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून नवीन बसेसचे धोरण ठेवण्यात आले आहे. गर्दीचा असो वा कमी गर्दीचा हंगाम, एसटीला एकाच मार्गावर अनेक बसेस सोडाव्या लागतात. त्यामुळे चालनीय खर्च बराच वाढतो.
एकूणच होणारा खर्च आणि जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक करता यावी या उद्देशाने डबल डेकर बस चालविण्याचा पर्याय महामंडळाकडून शोधण्यात आला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत डबल डेकर बस चालविण्याचा पर्याय अनेक वेळा समोर आला. मात्र एसटी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून तो धुडकावून लावण्यात आला होता. एसटी ज्या मार्गांवरून धावतात त्या मार्गावरील रस्ते आणि प्रवाशांची सुरक्षा पाहता डबल डेकर बस चालविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करीत हा पर्याय मागे ठेवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा डबल डेकर बसचा पर्याय निवडण्यात आला आहे. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, भारतात अशाप्रकारच्या बस नाहीत.
बेस्ट बसकडे जरी बस असल्या तरी तशा प्रकारच्या बस एसटीच्या मार्गांवर चालविणे शक्य नाही. त्यामुळे अशाप्रकारे बस असणाऱ्या चार कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वळणदार रस्ते, घाट आदींचा विचार केला जाईल आणि त्यावर बसची चाचणी घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Letter to four companies for double decker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.