संगणकीय युगात पत्रलेखनाला चालना मिळण्यासाठी राज्यपाल लिहिणार पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:15 AM2019-11-07T05:15:49+5:302019-11-07T05:16:06+5:30
मुंबईपेक्स टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन; भावनात्मक संवादासाठीचा मार्ग असल्याचे व्यक्त केले मत
मुंबई : नवनवीन तंत्रज्ञानाने जग जवळ येत असले, तरी पत्रलेखन हा संवादाचा पाया असून त्याचे विस्मरण होऊन चालणार नाही. पत्रलेखनाला चालना देण्यासाठी टपाल खात्यातर्फे आयोजित ‘ढाई आखर’ या पत्रलेखन स्पर्धेत पत्र लिहिणार असल्याची घोषणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. चर्चगेट येथील सुंदरबाई सभागृहात टपाल खात्यातर्फे आयोजित ‘मुंबईपेक्स’ या दोन दिवसीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून, यावेळी ‘गांधी आणि मुंबई’ या थीमवर १९२ फ्रेमद्वारे विविध विषयांची माहिती देणाऱ्या टपाल तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती यावर विशेष टपाल आवरण प्रकाशित करण्यात आले. राज्यपाल म्हणाले, पत्रलेखन हे भावनात्मक संवाद साधण्याचा मार्ग आहे. मोबाइल व संगणकाद्वारे साधण्यात येणाºया संवादामध्ये भावनात्मकता नसते. टपाल खाते आधुनिकतेकडे जात असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. महात्मा गांधींचे पाय नेहमी जमिनीवर होते, हात नेहमी वर्तमानात होते, तर डोके नेहमी भविष्यामध्ये असायचे. त्याप्रमाणे सर्वांनी वागण्याची गरज आहे. पत्रलेखन हा संवादाचा पाया आहे. तंत्रज्ञान बदलत राहील. मात्र, पाया विसरता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला. ‘ढाई आखर’मध्ये आपण पत्र लिहिणार असून, इतरांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रोबोटद्वारे फीत कापण्यात आली. दोन परीक्षकांद्वारे प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रदर्शनाची निवड करण्यात येणार असून, त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे, तर ७ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात येणारे विशेष कव्हर भारतातील पिनकोड पद्धतीचे एस.बी. वेलणकर यांना समर्पित करण्यात येणार आहे.
यावेळी संजीव कपूर, उषा ठक्कर, महाराष्ट्र व गोवाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल, मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या संचालिका केया अरोरा व इतर मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
प्रदर्शनाच्या आयोजिका व मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या, ‘यंदा मुंबई विभागात २० शाळांमध्ये फिलॅटॅली क्लब स्थापन करण्यात आले. त्यातील ३६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला. दोन परीक्षकांद्वारे प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रदर्शनाची निवड करण्यात येणार असून, त्यांना पारितोषिक देण्यात येईल.
जिल्हास्तरीय प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळेल. राज्यात ६४ फिलॅटॅली क्लब कार्यरत आहेत. फिलॅटॅलीबाबत जागृती व्हावी, विद्यार्थ्यांनी शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त छंद जोपासणे गरजेचे आहे. टपाल तिकीट जमविण्याच्या छंदातून त्यांना दोन्ही बाबी करणे शक्य होते.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी यावेळी प्रथमच झाडांच्या सुकलेल्या पानांचे विशेष आवरण तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या आवरणाला सुगंधित बनविले आहे. महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन देणारे विशेष आवरण प्रकाशित करून स्त्रियांच्या कष्टाला दाद देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.