Join us

महापालिकेच्या पत्राला पोलिसांकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:31 AM

दोन वर्षे उलटूनही परिस्थिती जैसे थे : धोकादायक बांधकामाबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : असल्फा येथे अनधिकृत आणि धोकादायक बांधकाम करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत महापालिकेने साकीनाका पोलिसांना लेखी पत्र देऊन तब्बल दोन वर्षे उलटली तरी अद्याप पोलीस त्याकडे डोळेझाक करीत कोणतीही कारवाई करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत या भागातील अनेक सोसायटींनी पाठपुरावा करूनही पोलीस दाद देत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.परेरावाडी येथे पाइपलाइन रोडवरील साईबाबा मंदिरासमोर अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या तक्रारी दोन वर्षांपूर्वी करण्यात आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. त्यावेळी याठिकाणी दुमजली बांधकामाच्या आत लोखंडी चॅनेल उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. अशा पद्धतीने बांधकाम करणे ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चुकीची पद्धत असून या बांधकामामुळे आजूबाजूच्या उर्वरित बांधकामांना धोका निर्माण होण्याची शक्यता महापालिका अधिकाºयांना आढळली.त्यामुळे महापालिकेने २0 जुलै २0१८ रोजी काम थांबवण्याची अधिसूचना बांधकाम करणाºयांना बजावली होती. मात्र तरीही बांधकाम थांबवण्यात न आल्याने ते बांधकाम आजूबाजूच्या बांधकामांवर कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाल्याने एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांची परवानगी घेऊन हे बांधकाम करणाºयांविरोधात योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करावा, असे पत्र सहायक अभियंता (इमारत व कारखाने) यांनी ३१ जुलै २0१८ रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना दिले होते.पोलिसांनी तेव्हापासून वेगवेगळी आणि न पटणारी कारणे देत महापालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. महापालिकेने पोलिसांना दिलेल्या पत्रानंतर या भागातील शिवशक्ती को. आॅप. हाऊसिंग सोसायटीने महापालिका आणि साकीनाका पोलीस ठाण्याला दिले होते. त्याचप्रमाणे पितृस्मृती को- आॅप हाऊसिंग सोसायटीनेही महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या इमारतीत भूमिगत तळघर बांधताना आजूबाजूच्या घरांना भेगा गेल्याचे निदर्शनास आणून तेथे सिलिंडरसारख्या ज्वालाग्राही वस्तूंचा साठा करण्यात आल्याने या धोकादायक प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.