Join us  

सुनील प्रभूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र :राज्य शासनाने आरे रुग्णालय ताब्यात घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:12 AM

मनोहर कुंभेजकर ।मुंबई : आरे येथील सेक्टर-१६ येथील दुग्ध विकास खात्याने दुर्लक्षित केलेले आरे रुग्णालय शासनाच्या आरोग्य विभागाकडे ताब्यात घेऊन त्या ठिकाणी आरेवासीयांच्या आरोग्यासाठी सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम १७ जुलैच्या अंकात‘आरे हॉस्पिटल चालवण्यास पालिकेची नकारघंटा’असे वृत्त दिले होते. या वृत्तामुळे पालिका प्रशासन आणि शासनाच्या दुग्धविकास विभागात जोरदार पडसाद उमटले. परिणामी, आरेवासीयांनीही ही मागणी लावून धरली आहे.पावसाळी विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी या रुग्णालयाला भेट दिली होती. आदिवासी आणि आरेतील नागरिकांना रुग्णसेवा मिळण्यासाठी हे रुग्णालय सुसज्ज करून ते दुग्ध विकास विभागाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला हस्तांतरित करावे, अशी मागणी नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी येथील आदिवासी बांधव आणि स्थानिक जनतेच्या वतीने पत्राद्वारे आमदार प्रभू यांच्याकडे केली होती.गोरेगाव (पूर्व) आरेतील रुग्णालय महापालिकेने ताब्यात घेण्यास तब्बल १४ महिन्यांनी नकार दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने एका पत्रानुसार पालिकेचे आयुक्त अजय महेता यांनी या रुग्णालयाचा ताबा घेणे पालिकेला उचित होणार नसल्याचे शासनाच्या दुग्धविकास विभागाला लेखी कळवले होते. त्यामुळे येथील दर्जेदार वैद्यकीय सेवेअभावी येथील आदिवासी बांधव आणि नागरिकांचे अतोनात हाल होत असून, उपचारासाठी खासगी किंवा पालिकेच्या सिद्धार्थ व अन्य रुग्णालयात जावे लागत आहे. आरेत २७ आदिवासी पाडे असून, ४६ झोपडपट्ट्याा आहेत. आरेतील ११ एकर जागेवर हे आरोग्य केंद्र वसले आहेत.आरेमध्ये २७ आदिवासी पाडे, आरेतील कर्मचाºयांची वसाहत असल्याने या आरोग्य केंद्राचा लाभ दररोज १०० ते १५० रुग्ण घेतात. येथील १४ खोल्यांपैकी फक्त १ ते २ खोल्याच सुरू असून, आरोग्य केंद्राचीही दुरवस्था वाढल्याने या रुग्णालयाला अखेरची घरघर लागली आहे. त्यातच या रुग्णालयासाठी आर्थिक तरतूददेखील नगण्य आहे, अशी माहिती आमदार प्रभू यांनी नमूद केली आहे.