मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचं एक पत्र माझ्या लालबागच्या पक्ष कार्यालयात आलं असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर MNS Leader Bala Nandgaonkar यांनी दिली आहे. याच पत्रासंदर्भात बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सुपूर्द केलं. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
"माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचं पत्र प्राप्त झालं आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवलं व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिलं आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचं आश्वासन मला दिलं आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं", असं बाळा नांदगावकर म्हणाले.
पत्रात नेमकं काय?अजान संदर्भात तुम्ही सुरू केलेलं आंदोलन थांबवा नाहीतर तुम्हाला तर जीवानिशी मारूच पण तुमच्या राज ठाकरेंचाही जीव घेऊ, अशी धमकी पत्रातून देण्यात आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. पत्र हिंदी भाषेत असून यात काही ऊर्दू ओळींचाही समावेश असल्याचं नांदगावकर म्हणाले. पत्र राज्य सरकारकडे सुपूर्द केलं आहे. आता ते त्याची चौकशी करतील अशी आशा आम्हाला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशीही मागणी यावेळी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.