कुर्ल्यातील अनधिकृत बांधकामांना अभय; पालिकेची कारवाईस टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:39 AM2023-12-12T09:39:47+5:302023-12-12T09:40:25+5:30
वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई : महानगरपालिकेच्या कुर्ला, एल वॉर्ड येथील कै. मीनाताई ठाकरे हिंदू स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीवर शेजारच्या खेतानी इंडस्ट्रीयल वसाहतीमधून व्यावसायिक गाळ्यांचे जवळजवळ १५० ते २०० फूट लांबीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत अनेक तक्रार व पाठपुरावा करूनही संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्याचे अवैधरित्या संरक्षण केले जात आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
कुर्ला एल वॉर्डच्या हद्दीत प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. त्यातच सार्वजनिक व मोकळ्या जागा भूमाफियांकडून गिळंकृत केल्या जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. या वॉर्डातील हिंदू स्मशानभूमीची जागा मिठीनदी प्रकल्पामुळे याआधीच ४० टक्क्यांनी कमी झाली असून, उर्वरित जागेत दहन व दफन विधी केले जातात. कै. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या स्मरणार्थ बांधलेली स्मशानभूमी याच जागेत असून, मालकीची सार्वजनिक मालमत्ता आहे.
बांधकामांकडे दुर्लक्ष ?
अनधिकृत बांधकाम एल विभागाच्या इमारत व कारखाने खात्याचे अधिकारी वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते मोहन आंबेकर यांनी केला आहे.
माहिती मागूनही दिली जात नाही :
बांधकामासंबंधी माहिती अधिकारात माहिती मागूनही दिली जात नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.
अत्यंत घनदाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात हिंदू स्मशानभूमीचे संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबई शहराला अनधिकृत बांधकामांमुळे आलेले विद्रूप स्वरूप, करदात्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय त्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, प्रदूषण, यंत्रणांवरील ताण, या गोष्टींना आळा बसायला हवा. पालिकेकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नाही, कारवाई होत नाही - मोहन आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप