ठाणे : ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनपूर्व कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात शुक्रवारी लेटलतिफी नाट्य रंगले. सोहळ्यास उशीर होत असल्यामुळे वेळेत आलेले ठाणे शहराचे आ. संजय केळकर वैतागून निघून गेले. हा राजकीय कार्यक्रम नसून सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. संमेलन वातावरणनिर्मितीसाठी संमेलनपूर्व सात दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मो.ह. विद्यालय येथे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या प्रयोगापूर्वी ५.३० वाजता होणार होते. हा सोहळा तब्बल दीड तास उशिराने सुरू झाल्याने वेळेत पोहोचलेल्या साऱ्यांनीच पहिल्याच दिवशी वैताग व्यक्त केला. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी व आ. केळकर, नाटकाचे कलाकार नियोजित वेळी उपस्थित होते. तब्बल एक तास कार्यक्रमाची वाट पाहून आ. केळकर हे वैतागून निघून गेले. नाट्यपरिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष व संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे येत आहेत. पाच मिनिटांत येतील, १० मिनिटांत येतील, अशी उत्तरे तब्बल दीड तास देणे सुरू होते. ७ वाजता ते हजर झाले आणि उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री मीना नेरूरकर, खा. विचारे, मो.ह. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र राजपूत, ज्येष्ठ अभिनेत्री मेधा भागवत, मध्यवर्ती शाखेचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे, दिग्दर्शक कुमार सोहनी, प्रा. प्रदीप ढवळ उपस्थित होते. आज खऱ्या अर्थाने संमेलनाचे उद्घाटन झाले, ही नांदी आहे. पहिल्यांदाच ठाण्यात होत असलेले हे नाट्यसंमेलन आनंदाची पर्वणी देऊन जाणार आहे. हे संमेलन व्यवस्थित पार पडेल. ठाणे शहराचे नाव नाट्यपरिषदेच्या इतिहासात लिहिले जाईल, असे ज्येष्ठ अभिनेत्री जोशी म्हणाल्या. नेरूरकर यांनी ठाण्यात आल्याची आठवण सांगितली. खा. विचारे म्हणाले की, या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे. नाट्यचळवळ सुरू झालेल्या मो.ह. विद्यालयापासून नाट्यसंमेलनाची सुरुवात होत आहे. स.पा. जोशी, नरेंद्र बल्लाळ, मामा पेंडसे, विलास परांजपे यांच्या स्मृतींना या माध्यमातून उजाळा देऊन त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत आणत आहोत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. नाट्यवर्तुळात कार्यरत असणारे हेमंत काणे, नाट्यक्षेत्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारे मोहन जोशी, मामा घाग, प्रकाश कुलकर्णी, जगदीश बर्वे, संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विद्याधर ठाणेकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभानंतर ‘कट्यार’चा प्रयोग सुरू झाला.
संमेलनपूर्व कार्यक्रम उद्घाटनात लेटलतिफी नाट्य
By admin | Published: February 13, 2016 2:39 AM