एसी लोकलला पहिल्याच दिवशी लागला लेटमार्क, नॉन एसीच्या प्रवाशांची घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:03 AM2020-02-01T03:03:23+5:302020-02-01T03:03:41+5:30
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेल ते ठाणे एसी लोकल शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र एसी लोकलला पहिल्याच ...
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेल ते ठाणे एसी लोकल शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. मात्र एसी लोकलला पहिल्याच दिवशी उशीर झाल्याने प्रवाशांची ठाणे स्थानकात गर्दी जमली. यासह एसी लोकलमधून नॉन एसीच्या प्रवाशांनी फुकटात प्रवास केला.
सकाळी ९ च्या सुमारास ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी जमली होती.
सकाळी ९.१९ वाजता येणारी ठाणे-नेरूळ लोकल सकाळी ९.४५ वाजता आल्याने एसी लोकलमध्ये चढण्यासाठी धक्काबुक्की झाली. एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात नॉन एसी लोकलप्रमाणे गर्दी होती. परिणामी एसी लोकलच्या दरवाजाजवळ प्रवासी उभे राहिल्याने दरवाजा बंद होण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांनी गर्दीचे नियोजन करून स्वयंचलित दरवाजे बंद झाले. दरवाजे बंद होण्यासाठी जास्त वेळ लागल्याने लोकलला इच्छितस्थळी पोहोचण्यास २० मिनिटांचा वेळ लागला.
ठाणे स्थानकातून एसी लोकल येत असल्याची उद्घोषणा केली जात होती. विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले. पहिल्या दिवशी विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पनवेलमध्ये थंड प्रतिसाद
एसी लोकलला पनवलेमध्ये थंड प्रतिसाद मिळाला. सकाळी ५ तिकिटे विकली गेली. दुपारी १५ ते २० तिकीटे विकली गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.