मुंबई : गेल्या महिन्याभरात कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. कोविड पॉझिटिव्हिटी दरानुसार मुंबई सध्या लेव्हल एकमध्ये आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लसचे संकट असल्याने मुंबईत लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील दैनंदिन वाढीचा दर सरासरी ०.०७ टक्के एवढा आहे. तसेच आता सक्रिय रुग्ण ही सात हजारांच्या आसपास आहेत. मात्र मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या, मुंबईत लोकलने दररोज येणारे प्रवासी आणि कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता, यामुळे मुंबईत सध्या लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. या वृत्ताला अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुजोरा दिला. तसेच पुढच्या आठवड्यात पुन्हा आढावा घेऊन निर्बंधांबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.