लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस परिसरातील अनधिकृत बांधकामाकडे अनेकदा विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. याला अखेर यश आले असून, लवकरच अनधिकृत बांधलेल्या झोपडपट्ट्यांवर विद्यापीठ प्रशासन कारवाईचा बडगा उचलणार आहे. त्यामुळे हा परिसर मोकळा श्वास घेणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पायाभूत सुविधा नियोजन अंमलबजावणी व देखभाल विभागाला दिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेना माजी सिनेट सदस्यांनी या झोपड्यांवर कारवाई करून त्या तातडीने निष्कासित करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली आहे.
कलिना परिसर येथील हयात प्रवेशद्वाराशेजारील क्रिकेट मैदानालगतच्या झोपडपट्ट्यांमुळे विद्यापीठाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. या झोपड्यांमध्ये विद्यापीठात रोजंदारीवर गवत कापण्याचे काम करणारे कामगार राहतात. या कामगारांच्या राहण्याची व्यवस्था अन्यत्र करून विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या झोपड्या हटविण्यात याव्यात, असे युवासेनेचे म्हणणे होते. विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई करण्याचे आदेश दिले, अशी माहिती युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.