आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम!

By संजय घावरे | Published: January 11, 2024 03:12 PM2024-01-11T15:12:22+5:302024-01-11T15:12:40+5:30

१३ जानेवारीला सिटीलाईट सिनेमागृहात होणार नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग

Liberation war of Marathwada in the Asian Film Festival | आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम!

आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम!

मुंबई - निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्य योद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

शनिवारी १३ जानेवारीला दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमागृहात या माहितीपाचे विशेष स्क्रिनींग होणार आहे. त्यानिमित्ताने मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' या नाट्य माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे आदी कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे. सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांतील संदर्भांच्या आधारे या माहितीपटाची संहिता लिहीण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथमच येत आहे. या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Liberation war of Marathwada in the Asian Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.