मनोहर कुंभेजकर,मुंबई : मालाड पश्चिमेकडील प्रसिद्ध अशा स्वतंत्रता उद्यान म्हणजेच लिबर्टी गार्डनचा लवकरच कायापालट होणार आहे. आज स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते भूमिपूजन करुन उद्यानाच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अस्लम शेख म्हणाले, नागरिकांना आनंददायी व सुखद वातावरणात काही क्षण व्यतित करता यावेत, त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी मतदारसंघात सर्वोत्तम उद्यानं असावीत यादृष्टीने मी सदैव प्रयत्नशिल राहिलो आहे. माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उद्यानांचे नूतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामांना गती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. स्वतंत्रता उद्यानाचे होत असलेले नूतनीकरण ही याच प्रयत्नांची फलश्रुती आहे.
जनता जो पैसा कररुपाने देते, त्या पैशांचा विनियोग हा जनतेच्या अपेक्षांनुसारच व्हायला हवा. या उद्यानाचे नूतनीकरण नागरिकांच्या सल्ल्याने, त्यांच्या संकल्पनांनुसारच होण्यासाठी उद्यानाच्या अभियंत्यांसोबत नागरिकांची बैठक घेऊन नागरिकांच्या सुचनांनुसार उद्यानामध्ये सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात येईल. मी मालाडच्या संदर्भात पाहिलेल्या विकासाच्या संकल्पना आज मूर्त स्वरुपात येत आहेत, याचा मनस्वी आनंद होतोय. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हे उद्यान आई-वडीलांना आपल्या मुलांसोबत, ज्येष्ठांना आपल्या नातवंडांसोबत, तरुणांना आपल्या मित्रपरिवारासोबत सुख-दु:खाचे क्षण व्यतित करण्यासाठीचं एक सुंदर केंद्र बनलेलं असेल, असा विश्वास अस्लम शेख यांनी शेवटी व्यक्त केला.