ग्रंथालये ही समाजाची ऊर्जा केंद्रे – डॉ. कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:08 AM2021-08-15T04:08:02+5:302021-08-15T04:08:02+5:30
मुंबई : व्यक्तीच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ग्रंथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासायलाच हवी. ग्रंथालये ही समाजाची स्फूर्ती ...
मुंबई : व्यक्तीच्या विशेषतः विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ग्रंथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासायलाच हवी. ग्रंथालये ही समाजाची स्फूर्ती आणि ऊर्जा केंद्रे आहेत, असे मत राज्य नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. १२ ऑगस्ट हा भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गुरुवार १२ ऑगस्ट रोजी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. यात ऐतिहासिक ग्रंथ, शासकीय प्रकाशने आणि मराठीतील निवडक साहित्यकृती ठेवण्यात आल्या. डॉ. कुलकर्णी यांच्यासह राज्य बालहक्क आयोगाचे सचिव उदय जाधव यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत काकड यांनी केले. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयेही या सप्ताहात विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी दिली. शुभांगी कारंडे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.