मुंबई : गोवंडी-शिवाजीनगर मधील जिजाबाई भोसले मार्गावरील पालिका शाळेच्या परिसरात बांधलेल्या ग्रंथालयाची अवघ्या दोन वर्षात दुरावस्था झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी बनविलेले हे सभागृह पालिकेच्या अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे गर्दुल्याचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी नशेबाज युवकांचा रात्रभर धिगांणा चालत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाजीनगर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज हॉल असावा, या हेतूने दोन वर्षापूर्वी पालिकेने मोठा गाजावाजा करीत ग्रंथालय बांधले. मात्र सुरुवातीला महिनाभर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली. त्यानंतर पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आणि या ‘लायब्ररी’ची ओळख आता गर्दुल्याचा अड्डा अशी बनली आहे. रोज रात्री गर्दुल्ले या ठिकाणी दारू पितात, नशा करतात, अनेकदा आपसात भांडणे करतात, असे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले. ग्रंथालयाच्या सर्व खिडक्यांच्या काचा या गर्दुल्ल्यांनी व गं्रथालयामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी फोडल्या आहेत. गर्दुल्ल्यांनी दारू पिऊ दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी फोडल्या आहेत. त्याच्या काचांचा खच ग्रंथालयाच्या चोहोबाजुंनी साचल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गर्दुल्ल्यांचा त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी कोणी त्या ग्रंथालयाकडे फिरकतसुद्धा नाही. येथील स्थानिकांनी ही बाब नगरसेविकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. एकदा पोलीस या ठिकाणी आल्याने दोन- तीन दिवस गर्दुल्ले ग्रंथालयाकडे फिरकले नव्हते, असे या परिसरातील अफझल खान या युवकाने सांगितले. (प्रतिनिधी)
ग्रंथालय बनले गर्दुल्ल्यांचा अड्डा!
By admin | Published: April 18, 2017 5:17 AM