मुंबई : ग्रंथालय वाचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्रातील ग्रंथालयांचे वैभव संपविण्याचे धारिष्ठ्य कोण दाखवत असेल तर त्याविरोधात लढा उभारला पाहिजे. आपण लोकशाही मार्गाने याविरोधात लढा उभारला पाहिजे. ग्रंथालयाच्या बचावासाठी लढण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ग्रंथालय बचावासाठी लढेंगे जितेंगे अशी घोषणा मेधा पाटकर यांनी केली.मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बचाव समितीतर्फे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वसाधारण सभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले. १९९२ साली ग्रंथसंग्रहालयाच्या बचावासाठी दुर्गा भागवत यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली होती. त्यानंतर सुमारे ४५ वर्षांनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अशी बैठक घेण्यात आली. या सभेत ग्रंथालय बचावासाठी ठराव मांडण्यात आले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, पत्रकार हेमंत देसाई, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, विजय तापस, मनसेचे यशवंत किल्लेदार आदी उपस्थित होते.या वेळी मेधा पाटकर म्हणाल्या की, संस्थेच्या कारभारात झालेले गैरव्यवहार तपासण्यासाठी नवीन कार्यकारिणीची नेमणूक करावी. त्याचप्रमाणे, या समितीत विजय तापस, सुनील कर्णिक, डॉ. संजय मं.गो., भूषण प्रभू यांचा समावेश करून ३० दिवसांत अहवाल सादर करावा. संस्थेच्या बंद पडलेल्या शाखा पुन्हा सुरू कराव्यात, घटना कालबाह्य झाली आहे, त्यामध्ये सकारात्मक बदल करावेत. कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती व वेतनाची पुनर्रचना करण्यासाठी नवीन कार्यकारिणी स्थापन करावी असे ठराव मांडण्यात आले. हे ठराव येत्या ३ तारखेला शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणाºया ग्रंथालयाच्या बैठकीत मांडण्यात यावेत, असेही त्या म्हणाल्या. तर ग्रंथालयाच्या कारभारात पारदर्शकता आणली पाहिजे. कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, ग्रंथालयाला विशेष दर्जा देऊन ग्रंथालयाचे अनुदान वाढवावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.पैसे मिळतात तिथेच सरकारचे लक्ष!ग्रंथालयाचे सांस्कृतिक वैभव वाचले पाहिजे, सरकारने याकडे लक्ष दिले पाहजे. ज्या संस्थांकडून पैसे मिळतात तिथेच सरकारचे लक्ष असते. मात्र ग्रंथ संस्था बंद पडल्या तरी काहीही फरक पडत नाही, अशी खंत रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केली.
ग्रंथालय बचावासाठी ‘लढेंगे जितेंगे’- मेधा पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 1:11 AM