चुकीचे औषध विकल्याने रुग्णाचा मृत्यू, मालाडच्या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:31 AM2018-08-13T06:31:19+5:302018-08-13T06:31:45+5:30
चुकीची औषधे विकणाऱ्या मालाड येथील दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे.
मुंबई : चुकीची औषधे विकणाऱ्या मालाड येथील दुकानदाराचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘फॉलीमॅक्स’ या व्हिटॅमिन औषधाऐवजी कर्करोगावरील उपचारांसाठी दिले जाणारे ‘फॉलीट्रॅक्स’ हे औषध मालाड येथील एका रुग्णाला देण्यात आले. या औषध विक्रीच्या वेळी त्या ठिकाणी फार्मासिस्ट गैरहजर होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
दिगंबर धुरी या रुग्णाला डॉक्टरांनी ‘फॉलीमॅक्स’ औषध घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु मालाडच्या कल्पेश मेडिकलमधून ‘फॉलीट्रॅक्स’ हे चुकीचे औषध त्यांना देण्यात आले. औषधाच्या ब्रॅँडच्या नावातील सूक्ष्म वेगळेपण लक्षात न आल्याने, दिलेल्या औषधाचा दुष्परिणाम धुरी यांच्या शरीरावर झाला आणि त्याच स्थितीत त्यांच्यावर मृत्यू ओढावला. यानंतर, धुरी यांची पत्नी आशा धुरी यांनी पोलीस ठाणे व अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे या विषयी तक्रार नोंदविली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
रजिस्टर्ड फार्मसिस्ट होता गैरहजर
औषध निरीक्षकांनी केलेल्या तपासात काही ठळक त्रुटी आढळून आल्या होत्या. यात रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या गैरहजेरीत शेड्यूल एच- १ औषधाची विना प्रिस्क्रिप्शन आणि विनाबिल विक्री केल्याचे निदर्शनास आले. बºयाच विक्री बिलावर फार्मासिस्टच्या सह्या नसल्याचेही आढळून आले. यावर सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने कल्पेश मेडिकल या दुकानदाराचा औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली.
परवानाधारक दुकानातूनच औषधे घ्या
ग्राहकांनी परवानाधारक मेडिकल स्टोअर्समधून रजिस्टर्ड फार्मासिस्ट यांच्या उपस्थितीतच औषधे खरेदी करावी. औषधे घेतल्यानंतर बिल घ्यावे, डॉक्टरांना दाखविल्यानंतरच औषधांचे सेवन करावे, प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे विकत मिळाली आहेत, याची खात्री करून बिल घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.