लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वरळीतील युनियन रेस्टॉरंट-पबविरूद्ध महापालिकेच्या जी दक्षिण विभागाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कोविड नियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पबला कारणे दाखवा नोटीस बजावली अूसन परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे.
युनियन रेस्टॉरंट आणि पबमध्ये पालिकेने जाहीर केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमले होते. डान्स करतानाही सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. सध्या क्षमतेच्या ५० टक्केच ग्राहकांना रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये परवानगी आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान लक्षात आले. त्याची गंभीर दखल घेत पालिकेने या रेस्टॉरंट-पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केला आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व रेस्टॉरंट-पबना कोरोनाचे नियम पाळा नाहीतर कारवाई करू, गुन्हा दाखल करू अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यासाठी पालिका आणि पोलिसांचे एक संयुक्त गस्ती पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दररोज परिसरात सर्व रेस्टॉरंट-पबची पाहणी करणार आहे.
सरकार आणि पालिकेने काही निर्बंध घालून लोकांसाठी सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, आता लोकांना या निर्बंधांचे भान राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे रेस्टॉरंट-पबमध्ये गर्दी झाली तर मालकाप्रमाणे तिथे जमणाऱ्यांविरोधातही आता कारवाई व्हायला हवी,- किशोरी पेडणेकर (महापौर)