मुंबई : नाल्यांच्या आसपास राहणारे रहिवासी सर्रास त्यात कचरा टाकतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, कचरा साठून रोगराई पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा नाल्यांच्या परिसरावर ‘क्लीन अप मार्शल्स’चा पहारा ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता, पण हे व्यवहार्य नसल्याने, आता नाले पॉलीकार्बाेरेट शेडद्वारे आच्छादित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. मात्र, छोटे नालेच केवळ झाकण्यात येणार असल्याने, मोठ्या नाल्यांचा प्रश्न अनुत्तरितच आहे.मुंबईतील मोठ्या व छोट्या नाल्यांची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात येते. मात्र, नाल्यांच्या आसपास राहणारे रहिवासी या नाल्यांचा वापर कचराकुंडीसारखा करीत असतात. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबत असल्याने, मुंबईतील अनेक भागांमध्ये ‘पाणीबाणी’ होते. ही बाब जाणवल्यानंतर महापालिका प्रशासनाने, नाल्यांच्या परिसरावर नजर ठेवून त्यात कचरा टाकणाऱ्यांना दंड करण्यासाठी क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. अशा १२५ नाल्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे नाल्यांवर झाकण घालण्याची मागणी नगरसेवकांकडून पुढे आली होती, पण असे करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने दीड ते पाच मीटरपर्यंतच्या छोट्या नाल्यांना पॉलीकार्बाेरेट शेडद्वारे आच्छादित करण्यात येणार आहे. कांदिवली (प) येथील पंचोलिया नाला (चारकोप पंपिंग स्टेशन नाला) कांदिवली, पूर्व येथील आशानगर नाल्यांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.पालिकेच्या अखत्यारित २६० किमीपर्यंतचे मोठे नाले आहेत.४६५.१३ किमीचे छोटे नाले व रस्त्यांच्या कडेला असलेल्या २ हजार ४९ किमी लांबीच्या नाल्यांची देखरेख पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत केली जाते.
छोट्या नाल्यांवर ‘झाकण’, पॉलीकार्बोरेट शेडने आच्छादित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:25 AM