१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख क्वारंटाईन होते, मग हे कोण?; व्हिडीओ दाखवत फडणवीसांचा पवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:02 PM2021-03-22T14:02:55+5:302021-03-22T14:03:25+5:30
"परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला
मुंबई - परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील या घनटेवरुन आज संसदेत चांगलाच गदारोळ पहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या दाव्यानंतर भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांचं जुनं ट्विट नव्याने शेअर करत शरद पवार खोटं बोलत असल्याचं म्हटलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही देशमुखांचे ते ट्विट शेअर केलंय.
"परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असं म्हणत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली. "अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झालंय", असं पवार म्हणाले. मात्र, त्यानंतर काही वेळातच भाजपा नेत्यांनी ट्विट करुन अनिल देशमुख यांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद कसकाय घेतली, असा प्रश्न विचारला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारीचे ट्विट रिट्विट केलंय. तसेच, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद झाली होती. हे नेमके कोण? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. या व्हिडिओत अनिल देशमुख पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. त्यांच्या पाठीमागे सुरक्षा रक्षकही दिसून येत आहेत. तर, त्यांच्या समोर माध्यमांचे बूम माईकही दिसत आहेत. त्यामुळे, पवारांनी केलेल्या दाव्यावरच प्रश्चचिन्ह निर्माण झालंय.
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.
हे नेमके कोण? https://t.co/r09U8MZW2m
भाजपाचे नेते अमित मालविया यांनीही अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारीचे ट्विट शेअर केलं आहे. तसेच, शरद पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार अनिल देशमुख 15 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयात होते. मग, 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली? तुमचं खोटं उघडं पडलं, असे मालविया यांनी म्हटलंय.
Sharad Pawar claims Anil Deshmukh was in hospital from 5-15 Feb and in quarantine from 16-27 Feb.
— Amit Malviya (@amitmalviya) March 22, 2021
But Anil Deshmukh was holding a press conference on 15 Feb...
How lies fall flat! https://t.co/ceZGxFaIYz
वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटी
अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाइन होते. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं दिसून येत आहे, असं शरद पवार म्हणाले.
एटीएस अतिशय योग्य तपास करतंय
"मनसुख हिरेन प्रकरणाचा एटीएस अतिशय योग्य दिशेनं तपास करत आहे. या प्रकरणात शेवटचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागले आहेत आणि निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. त्याचवेळी तपासावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी परमबीर सिंग यांनी पत्र लिहून खोटे आरोप केले आहेत", असा दावा शरद पवार यांनी केला आहे. "परमबीर सिंग यांना वसुलीचं टार्गेट दिलं होतं मग ते महिनाभर गप्प का बसले होते? त्यांची बदली झाल्यावरच ते का बोलले?", असे सवालही यावेळी पवार यांनी उपस्थित केले आहेत.