पत्नी व मुलास जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप

By admin | Published: April 8, 2017 11:35 PM2017-04-08T23:35:47+5:302017-04-08T23:35:47+5:30

रिक्षा घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून सात महिन्यांची गरोदर पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलास जिवंत जाळणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा

Life and life saving the wife and child alive | पत्नी व मुलास जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप

पत्नी व मुलास जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप

Next

मुंबई : रिक्षा घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून सात महिन्यांची गरोदर पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलास जिवंत जाळणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चिंचोरा गावातील निसार रमजान सय्यद या नराधमास सर्वोच्च न्यायालयाने फाशीऐवजी मरेपर्यंत जन्मठेप ठोठावली आहे.
पत्नी सुमय्या आणि मुलगा सायेज यांना राहत्या घरात रॉकेल ओतून जिवंत जाळल्याबद्दल अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने निसार सय्यदला १५ मार्च २०११ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या न्या. नरेश पाटील व न्या. टी. व्ही. नलावडे यांच्या खंडपीठाने १९ मार्च २०१२ रोजी निसार सय्यदचे अपील मंजूर करून त्याची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली होती. याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात न्या. पिनाकी चंद्र घोष व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने मंजूर केले व निसार सय्यदला पत्नी व मुलाच्या खुनांबद्दल दोषी ठरविले. मात्र त्याला फाशी न देता मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.
निसार सय्यद व सुमय्या यांचे ३० मार्च २००७ रोजी लग्न झाले. त्यांना सायेज हा पहिला मुलगा झाला व सुमय्या पुन्हा गरोदर होती. लग्नानंतर साधारण वर्षभर निसार सुमय्याला चांगले वागवत होता. परंतु नंतर रिक्षा घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणले नाहीत म्हणून तिचा छळ सुरू झाला. दि. २९ आॅक्टोबर २०१० रोजी पहाटे ५च्या सुमारास निसारने सुमय्याच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले व ती पेटत असताना मुलगा सायेज यालाही तिच्या अंगावर फेकले. जबर भाजल्याने सायेज जागीच मरण पावला तर ९० टक्के भाजलेल्या सुमय्याने पाच दिवसांनी वडाळा मिशन इस्पितळात प्राण सोडले.
या खटल्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परंतु सुमय्याने माहेरच्या नातेवाइकांकडे तोंडी स्वरूपात तीन व पोलीस आणि डॉक्टरांकडे लेखी स्वरूपात तीन अशा एकूण सहा मृत्युपूर्व जबान्या दिल्या होत्या. उच्च न्यायालयाने त्या अविश्वसनीय मानल्या. शिवाय एवढे मोठे जळीतकांड होऊनही उसाच्या पाचटाने शाकारलेले घराचे छत किंवा घरातील इतर कोणत्याही सामानास जराही झळ न पोहोचणे आणि मुलगा सायेज याचे प्रेत घरापासून २००-२५० फूट अंतरावर मिळणे यांसारख्या गोष्टींवरून मुळात ही घटना सय्यदच्या घरात झाली असावी, यावरही उच्च न्यायालयाने शंका घेतली होती.
मात्र, सुमय्याने तिच्या सर्व मृत्युपूर्व जबान्यांमध्ये पतीने रॉकेल ओतून पेटविल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले आहे व मृत्यूच्या दाढेत असलेली व्यक्ती शक्यतो निष्कारण खोटे बोलत नाही, असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तिच्या मृत्युपूर्व जबान्या विश्वासार्ह मानल्या; शिवाय घरात त्याच्यासोबत राहणाऱ्या पत्नी व मुलाचा अशा प्रकारे जळून कसा मृत्यू झाला हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आरोपी निसार सय्यदवर होती. परंतु त्याने याचा काहीही खुलासा केलेला नाही यावरून त्याच्यावरील संशयास बळ मिळते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
या अपिलाच्या सुनावणीत राज्य सरकारसाठी अ‍ॅड. कुणाल ए. चिमा यांनी तर आरोपीसाठी अ‍ॅड. अतुल बाबासाहेब डाख यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)

फाशी का दिली नाही?
आरोपी निसार सय्यदने एकावेळी तीन खून केल्याचे सिद्ध होऊनही त्याला फाशी न देण्याची न्यायमूर्तींनी प्रामुख्याने पुढील कारणे दिली-

- आरोपीचे गुन्हे सिद्ध होण्यास पत्नीच्या मृत्युपूर्व जबान्या हाच एकमेव सबळ पुरावा आहे.
फक्त दहशतवादाच्या आणि राष्ट्रविरोधी गुन्ह्यांसाठीच फाशी दिली जावी, अशी शिफारस विधी आयोगाने ताज्या अहवालात केली आहे.
हे खून ‘विरळात विरळा’ नाहीत. न्यायाधीश हेही माणूस असल्याने त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते. त्यामुळे भविष्यात तसे लक्षात आल्यास ती सुधारण्यास वाव राहावा.

Web Title: Life and life saving the wife and child alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.