सद्गुरूंसारख्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्यावर जीवनाचे सोने झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:20+5:302021-06-01T04:06:20+5:30
नामधारकांचे अनुभव; सद्गुरू श्री वामनराव पै यांचे नववे पुण्यस्मरण मुंबई : सद्गुरू वामनराव पै यांना २९ मे २०१२ रोजी ...
नामधारकांचे अनुभव; सद्गुरू श्री वामनराव पै यांचे नववे पुण्यस्मरण
मुंबई : सद्गुरू वामनराव पै यांना २९ मे २०१२ रोजी देवाज्ञा झाली. जीवन विद्यारूपी तत्त्वज्ञानाचे निर्माते सद्गुरू वामनराव पै यांचे २९ मे रोजी नववे पुण्यस्मरण झाले. यावेळी सद्गुरूंच्या प्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. जीवनविद्या मिशनच्या यू-ट्यूब चॅनलवर ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा काळ पाहता सद्गुरूंच्या सर्व नामधारकांनी ऑनलाईन कार्यक्रमामार्फत आदरांजली अर्पण केली. सद्गुरूंसारख्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्यावर जीवनाचे कसे सोने झाले, असे अनुभव नामधारकांनी यावेळी सांगितले.
सद्गुरू वामनराव पै यांच्या आठवणींना ऑनलाईन कार्यक्रमातून उजाळा देण्यात आला. अनेक नामधारकांनी जीवनविद्या मिशनच्या तत्त्वाज्ञानाचे त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगितले. कार्यक्रमात सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी नामसंकीर्तन गायली. कार्यक्रमाचे शेवटी सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव ट्रस्टी प्रल्हाद वामनराव पै यांनी मार्गदर्शन केले. सद्गुरूंच्या महानिर्वाणानंतर संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच सद्गुरूंना नामधारकांकडून काय अपेक्षित आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगदीश बोंद्रे यांनी केले.
दरम्यान, ‘ तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा दिव्य संदेश देणाऱ्या सद्गुरू वामनराव पै यांचा दिव्य संकल्प होता. हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्तान हे राष्ट्र प्रगतिपथावर जावे, हा सद्गुरूंचा दिव्य संकल्प; सद्गुरू आयुष्यभर हे जग सुखी व्हावे यासाठी प्रयत्नशील राहिले. सद्गुरू वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि असंख्य नामधारकांच्या साथीने प्रल्हाद वामनराव पै यांनी पुढील धुरा सांभाळली.
...............................................