पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:19 AM2019-07-09T06:19:13+5:302019-07-09T06:20:00+5:30

ठाणे, नवी मुंबई, अलिबाग : धरणाचा साठा वाढला

Life disruption due to rain | पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

नवी मुंबई : रविवारी व सोमवारी दिवसभर ठाणे, नवी मुंबई, अलिबाग परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. खारघर परिसरातील कोपरा नाला फुटल्याने तुर्भे एमआयडीसी परिसरातील बोनसई गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. गावालगतचा नाला तुंबल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अखेर जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातील अडथळे दूर करून पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग मोकळा केला.


शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या, तर सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. पावसामुळे शॉर्टसर्किट व आग लागण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. रविवारी २४ तासांमध्ये एका ठिकाणी आग व एका ठिकाणी शॉर्टसर्किट झाले होते. विजेचा धक्का लागून एकाला जीव गमवावा लागला होता. सोमवारी दोन ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


गोल्फ कोर्समध्ये शिरले पाणी

खारघर शहरातील गोल्फ कोर्स, टाटा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रुग्णालयातील तळमजल्यावर कर्करुग्णांना थेरेपी देण्याचे काम ज्या विभागात चालते, त्याच विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन व रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली.
देहरंग, रानसई ओव्हरफ्लो
पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता आहे. उरण शहर व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरणही दुथडी भरून वाहू लागले आहे, तर नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील जलसाठाही वाढू लागला आहे. धरणातील साठा ७६.२० मीटरपर्यंत वाढला आहे. यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. प्रतिदिन किमान एक मीटरने धरणाची पातळी वाढत आहे.

उल्हासनगरमध्ये स्लॅब पडला
च्ठाणे : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पाऊस पडला. रविवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील खेमाणी परिसरातील हूमलॉग अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्याचा स्लॅब निखळून तिसऱ्या मजल्यावर पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान ठाणे पूर्वच्या मीठबंदर रोडवर झाडाची मोठी फांदी तुटली.
च्शहरात ठिकठिकाणी सात झाडे धोकादायक स्थितीत असून, दहा झाडे उन्मळून पडली आहेत. ठाणे शहर परिसरात आज दिवसभरात ५० मिमी सरासरी पाऊस पडला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २७ मिमी पाऊस पडला आहे. ठाणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक सोसायट्यांमध्येही पाणी साचले होते. पावसाने जिल्ह्यातील चिखलोली धरण पूर्ण भरले आहे.

रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला
अलिबाग : गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यातून वाहणाºया सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या नद्यांचे पाणी महाड शहरात घुसले, तर भिरा धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. त्याप्रमाणे डोलवहाळ बंधाºयातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अंबा नदी खोºयामध्ये पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असल्याने नदी काठची गावे, वाड्यांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.


जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात पावसाच्या तडाख्यामुळे ७८ लाख ६२ हजार रुपयांच्या खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, तर चार जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, जून महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. पावसाने रायगडला चांगलाच दणकाही दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली आहे. या आपत्तीत घरे व गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एक घर जमीनदोस्त झाले आहे, तर अंशत: पडझड झालेल्या ११९ पैकी ३७ घरे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरली आहेत. गेल्या ३६ दिवसात जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील एका सार्वजनिक तर १३ खासगी मालमत्तेचे ७८ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तात्पुरत्या स्वरूपात निराधार झालेल्या ३ कुटुंबांमधील ४ व्यक्ती बाधित झाल्याने त्यांना पाच लाख रुपयांची मदतही देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती विभागाने दिली.

Web Title: Life disruption due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस