इच्छामरण मागणा-या रुग्णाला डॉक्टरांनी दिले जीवनदान; ७ वर्षे आजाराशी झुंज दिल्यानंतर तब्येतीत सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:29 AM2017-12-16T03:29:57+5:302017-12-16T03:30:30+5:30
इच्छामरणाची याचना करणा-या भांडुपच्या संपदा पारकर यांना डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. पारकर या २०१०पासून मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्रस्त होत्या. गेल्या दोन वर्षांत या आजारामुळे त्यांची परिस्थिती आणखीच खालावली.
मुंबई : इच्छामरणाची याचना करणा-या भांडुपच्या संपदा पारकर यांना डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. पारकर या २०१०पासून मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्रस्त होत्या. गेल्या दोन वर्षांत या आजारामुळे त्यांची परिस्थिती आणखीच खालावली. प्रचंड वेदना, अन्नावरची वासना उडालेली असल्यामुळे पराकोटीचा अशक्तपणा आल्याने या ३७ वर्षीय तरुण महिलेवर अंथरुणाला खिळण्याची वेळ आली. यामुळे कुटुंबीयांना शासकीय यंत्रणेकडे इच्छामरणासाठी अर्ज करण्याची विनवणी त्या वेळोवेळी करत होत्या, मात्र कुटुंबीयांनी अखेरचा उपाय म्हणून मुलुंड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले अन् ते डॉक्टर ‘देवदूत’च ठरले.
एका खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. या उपचारांवर होणारा खर्च रुग्णाच्या कुटुंबालाही परवडेनासा झाला होता. त्या वेळी त्या रुग्णाने वेदनेला कंटाळून कुटुंबाकडे स्वेच्छामरणाचाही विचार बोलून दाखवला होता. २००५ साली संपदा पारकर यांना मधुमेह झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणतीही आरोग्यविषयक तक्रार जाणवली नाही. परंतु, २०१० साली प्रचंड तणावाला सामोरे गेल्यानंतर, पारकर यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. साधारण ६ वर्षे अन्न खाण्याची इच्छाच होत नव्हती. पण, त्यामागचे खरे कारण काही केल्या समजत नव्हते. या सगळ्यानंतर, अनेक वर्षांनी म्हणजे २०१५ साली रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पारकर यांना डायलिसिस सुरू केले.
फेब्रुवारी २०१७मध्ये वजन प्रचंड वाढलेल्या अवस्थेत संपदा यांना मुलुंड येथील दुसºया एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या पोटात असह्य वेदना होत होत्या, डोके दुखत होते. अनेक तपासण्या केल्यानंतर लक्षात आले की, आतापर्यंत योग्य उपचार न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच नाजूक व गंभीर बनली होती. त्यांची तब्येत सुधारण्याकरिता आठवड्यातून तीन वेळा हिमोडायलेसिस करावे लागेल, असा सल्ला दिला. सुयोग्य व पुरेशा प्रमाणात फिजिओथेरपी व आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेतले. त्यानंतर, पुढच्या १५ दिवसांत त्यांच्या पायांमध्ये हालचाल झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या स्नायूंमधली ताकद वाढली व आधार घेऊन त्या स्वत: उभ्या राहू लागल्या, असे न्यूरोलॉजीस्ट डॉ. धनश्री चोणकर यांनी सांगितले.
काही आर्थिक अडचणींमुळे आधीच्याच रुग्णालयात उपचार सुरू ठेवावे लागले. त्या रुग्णालयातल्या तीव्र औषधांमुळे, अयोग्य उपचार आणि चुकीच्या आहारसवयींमुळे वजन खूप वाढले आणि शरीरातल्या द्रवाच्या प्रमाणावरही विपरीत परिणाम झाला. मी पूर्णत: अंथरुणाला खिळले होते, मात्र दुसºया रुग्णालयात उपचार सुरू केल्यानंतर लगेचच फरक पडला.
- संपदा पारकर, रुग्ण
संपदा यांची तब्येत केवळ डायलेसिस, फिजिओथेरपी आणि वेळोवेळी योग्य उपचार घेतल्यामुळेही सुधारू शकणार होती. काही महिन्यांपूर्वी संपूर्णत: अंथरुणावर खिळलेल्या संपदा आता मात्र दैनंदिन दिनचर्या स्वतंत्रपणे पार पाडू शकतात. फिजिओथेरपी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासल्यानंतर त्यांच्या स्नायूंमध्ये ताकद यायला लागली. रुग्णालयातून रजा मिळेपर्यंत त्यांची पचनक्रियाही विकसित झाली आणि काही वेळा येणारा अशक्तपणाही बंद झाला.
- डॉ. वैभव केसकर, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ