मुंबई : इमारतीला लागलेल्या आगीतून ‘वाचवा वाचवा’ असे शब्द कानी पडताच, पोलीस उपनिरीक्षक रमेश आंबेडकर यांनी जीवाची पर्वा न करता आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दरवाजा तोडून, अंथरुणाला खिळलेल्या भावाला खांद्यावर घेत, त्याच्या बहिणीला हाताने आधार देत बाहेर काढले. खांद्यावरूनच त्यांना खाली आणत, समोरच्या इमारतीत सुखरूप पोहोचविल्याने या दोन भावंडांना जीवनदान मिळाले. स्थानिक रहिवाशांनी वरिष्ठांना पत्र लिहून अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.
बांगुरनगर येथील साई अमर इमारतीत रणबीर कौर (६७), रणजीत सिंग (६५) ही दोन भावंडे राहतात. शनिवारी साडेपाचच्या सुमारास अचानक इमारतीला आग लागली. आगीच्या माहितीने रहिवाशांनी पळ काढला. मात्र रणजीत हे पक्षाघात झाल्यामुळे अंथरुणाला खिळले होते. या अवस्थेत त्यांना घेऊन बाहेर पडणे रणबीर यांना शक्य झाले नाही. दोघेही धुरात आतच अडकले. घटनेची माहिती मिळताच, आंबेडकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या रणबीर या वाचवण्यासाठी आरडाओरड करीत होत्या. अग्निशमन दलाचे अधिकारी येईपर्यंत आंबेडकर यांनीच इमारतीत प्रवेश केला. आगीचे लोळ पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. परिस्थती गंभीर झाली होती. आग पसरतच चालली होती.आंबेडकर यांनी कुठलाही विचार न करता प्रसंगावधान राखत कसेबसे कौर यांचे घर गाठले. दरवाजा तोडला. तेव्हा, धुरामुळे दोघांचीही प्रकृती ढासळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रणजीत यांना खांद्यावर घेतले, तर रणबीर यांना हाताचा आधार देत काळोख आणि आगीच्या ज्वाळांतून वाट काढत सुखरूप बाहेर काढले.
दोघेही सुखरूप बाहेर आल्याचे पाहताच तेथे उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा गजर केला. दोन्ही वृद्धांना तत्काळ वैद्यकीय मदत देत, समोरच्या इमारतीत राहत असलेल्या नातेवाइकांच्या घरी सोडण्यात आले.सोमवारी सोसायटीतील रहिवाशांनी बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे लेखी पत्राद्वारे आंबेडकर यांच्या कामगिरीचे कौतुक करीत आभार मानले. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.