Join us

स्वादुपिंड प्रत्यारोपणाने महिलेला जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 6:05 AM

सातत्याने अवयवदानाविषयी करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे यंदाच्या नव्या वर्षापासून अवयवदानाचे प्रमाण वाढते आहे.

मुंबई : सातत्याने अवयवदानाविषयी करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे यंदाच्या नव्या वर्षापासून अवयवदानाचे प्रमाण वाढते आहे. नुकतेच ठाण्यातील खासगी रुग्णालयात ३३ वर्षीय महिलेवर स्वादुपिंद आणि मूत्रपिंड यांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबई विभागातील ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याची माहिती जिल्हा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे. मुंबईत झालेले हे पहिलेच प्रत्यारोपण असून महाराष्ट्रात दुसऱ्यांदा असे प्रत्यारोपण झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली होती.डोंबिवलीतील ही महिला असून तिला वयाच्या १६ व्या वर्षापासून मधुमेहाचा आजार होता. परिणामी तिच्या मूत्रपिंडाचे कार्य मंदावले होते आणि कार्यक्षमतेवर परिणाम झाला होता. ती काही वर्षांपासून डायलिसिसवर होती. पण लहान वयात झालेल्या मधुमेहाच्या आजारात अशा स्थितीत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. त्यानुसार मूत्रपिंडासह स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा डॉक्टरांनी सल्ला दिला आणि तिच्यावर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि तिला जीवनदान मिळाले आहे.