Join us

‘लाइफ रही तो दोबारा मिलेंगे...’ म्हणत मुलीने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 1:03 AM

बोरीवलीतील प्रकार; आई ओरडल्याने उचलले पाऊल

मुंबई : आई ओरडली म्हणून, ‘सॉरी मैं घर छोडके जा रही हूँ, लाइफ रही तो दोबारा मिलेंगे’ असे पत्र लिहून ते घराच्या दरवाजावर लावून आठवीतल्या विद्यार्थिनीने घर सोडल्याचा प्रकार बोरीवलीत उघडकीस आला. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

बोरीवली परिसरात १३ वर्षीय नेहा (नावात बदल) आईवडील, भावंडांसह राहते. येथीलच शाळेत ती आठवीत शिक्षण घेत आहे. तिची आई सुरक्षारक्षक म्हणून काम करते व उर्वरित वेळेत काही ठिकाणी घरकामही करते. सोमवारी नेहा उशिरा उठल्याने शाळेत गेली नाही. त्यामुळे आई ओरडली. त्यानंतर, दुपारी साडेअकराच्या सुमारास आई घरकामासाठी निघून गेली. साडेबाराच्या सुमारास ती घरी परतली, तेव्हा घराला टाळे होते. घराच्या दरवाजावर, ‘सॉरी मैं घर छोडके जा रही हूँ, लाइफ रही तो दोबारा मिलेंगे और सॅम को मत पकडना, बाय..’ असा मजकूर लिहिला होता. ते वाचून आईला धक्का बसला.

तिने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला, तेव्हा नेहाची शाळेची बॅग आणि कपडे गायब होते. आईने तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र, ती तेथे नव्हती. राग शांत झाला की ती घरी येईल, या विचाराने आईने काही वेळ वाट बघितली. मात्र, संध्याकाळ होऊनही ती घरी न परतल्याने, रात्री उशिराने तिने एमएचबी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिली.