जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 04:35 PM2018-05-02T16:35:28+5:302018-05-02T16:38:23+5:30
ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणातील अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 9 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्या प्रकरणातील अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 9 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पत्रकार जिग्ना वोरा व पॉल्सन जोसेफची निर्दोष मुक्तता केली आहे. छोटा राजनसहीत 9 जणांना दोषी ठरवत जन्मठेप सुनावली आहे. सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोदिया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत.
मुंबईतील विशेष मकोका न्यायालयानं हा निकाल दिला आहे. डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण 12 आरोपींना मकोकान्वये गजाआड करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार जिग्ना वोराचाही समावेश होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार डे यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे राजन अस्वस्थ होता आणि त्यामुळे डे यांची छोटा राजन टोळीनं हत्या केली.
कोण होते जे. डे.
जे. डे. हे एक ज्येष्ठ पत्रकार होते. 11 जून 2011 रोजी पत्रकार जे. डे यांची छोटा राजन टोळीने हत्या केली. मोटरसायकलवरून जाताना त्यांच्या पाठीत पाच गोळ्या घालण्यात आल्या. जे. डे त्यांच्या वेगळ्या बातम्यांसाठीच ओळखले जात होते. आधी इंडियन एक्स्प्रेस, अल्पकाळ चॅनल 7 आणि त्यानंतर मिड्डेचे संपादक (इन्व्हेस्टिगेशन) म्हणून काम करताना त्यांनी ज्या बातम्या दिल्या त्या वेगळं काही तरी उघड करत केवळ सर्वसामान्यांनाच नाही तर अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारण्यांनाही हादरवणाऱ्या होत्या. जे. डे. यांनी गुन्हेगारी जगतावर खल्लास, झीरो डायल ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत. हत्या झाली त्यावेळीही ते एका पुस्तकाच्या तयारीत होते. चिंदी - रॅग्स टू रिचेस या पुस्तकात त्यांनी छोटा राजनला चिंधी असं संबोधले होते. 11 जूनला सतीश कालिया साथीदारांसह त्या परिसरात पोहोचला. सतीश कालिया मोटरसायकलवर होता. जे. डे.चा काही वेळ पाठलाग करुन लगेच त्याने त्यांच्या पाठीत पाच गोळ्या मारल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.