मुंबई : धक्का लागला, रागाने बघितले, अंगावर पाणी उडाले, वाहन बाजूला घेण्यास सांगितले यासारख्या क्षुल्लक वादातून हत्येच्या घटना डोके वर काढत आहे. गेल्या वर्षभरात १३३ हत्येच्या घटना घडल्या आहेत. यापैकी १२९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
२०२१ च्या तुलनेत घटनांचे प्रमाण ३१ ने कमी आहे, तर किरकोळ वादातून हत्येचा प्रयत्न प्रकरणी २४४ घटनांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. यावर्षी गेल्या दहा महिन्यांत १०५ हत्येच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी १०० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
अनैतिक प्रेमसंबंधातून हत्यासत्र : प्रेमसंबंध तसेच अनैतिक प्रेमसंबंधातून हत्यासत्र घडत असल्याचेही समोर येत आहे. २०२१ मध्ये दाखल वैयक्तिक वाद (२४), प्रेमसंबंध (८), तर अनैतिक संबंध (३), तर किरकोळ वादातून ६३ हत्या घडल्या होत्या.
चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या: चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच हत्या करून मृतदेह सुटकेसमधून फेकल्याचे धारावीत समोर आले. याप्रकरणी धारावीत राहणाऱ्या २२ वर्षीय प्रियकर अस्कर मनोज बरला (वय २२) याला गुन्हे शाखेने अटक केली.
गोवंडीत उघडकीस आली सैराटची पुनरावृत्ती :घरच्यांचा विरोध डावलून प्रियकरासोबत संसार थाटल्याच्या रागातून वडिलांसह भाऊ, त्याचा मित्र आणि अन्य तीन अल्पवयीन मुलांनी मुलीसह तिच्या पतीची निर्घृण हत्या केल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना ऑक्टोबरमध्ये गोवंडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. सैराट चित्रपटातील कथानकाप्रमाणे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक करत तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.
जुन्या वादातून मुंबादेवी परिसरात हत्या: मुंबादेवी परिसरात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोकमान्य टिळक(एल.टी) मार्ग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन हमालांना एलटी मार्ग पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्यांनी गळा दाबून मृत व्यक्तीची हत्या केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.