Join us

ईस्टर्न फ्रीवेचे आयुर्मान पाच वर्षांनी वाढणार, मुंबईत प्रथमच मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर

By जयंत होवाळ | Published: December 20, 2023 7:50 PM

या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूकपूर्ववत होत आहे.

मुंबई: ईस्टर्न फ्रीवेचे आयुर्मान आणखी पाच वर्षांनी वाढणार आहे. मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्ता मजबुतीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून मुंबईत पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. फ्रीवेवर एका बाजुचे मायक्रो सर्फेसिंगचे  काम पूर्ण झाले आहे.या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूकपूर्ववत होत आहे.

मुंबईच्या दिशेने येणाऱया रस्त्यावरील ९ किलोमीटर अंतराचे 'मायक्रो सर्फेसिंग ’ पूर्ण झाले आहे, तर दुसऱया बाजूच्या रस्त्यावरील सुमारे दीड किलोमीटर अंतराचे देखील काम पूर्ण झाले आहे. 'मायक्रो सर्फेसिंग ’ समवेत रस्त्याच्या दुभाजकांना रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये रोपे व हिरवळ लागवड करणे,संरक्षक भिंतींची रंगरंगोटी आदी कामे देखील करण्यात येत आहेत. या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी पूर्वी एमएमआरडीए कडे होती. हा मार्ग पालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर आता पालिका देखभाल करत आहे.

पारंपरिक पद्धतीने डागडुजी करताना रस्त्यावरील डांबराचा संपूर्ण (सुमारे ६ इंच) थर काढून पूर्ण नवीन थर टाकला जातो. तर, 'मायक्रो सर्फेसिंग मध्ये, डांबराचा रस्ता खराब होवू नये म्हणून त्यावर सुमारे ६ ते ८ मिलीमीटरचे मजबूत असे आवरण केले जाते. या तंत्रज्ञानाद्वारे एका दिवसात सरासरी १ किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे शक्य होते. दररोज रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत टप्प्या-टप्प्याने भक्ती पार्क ते पी. डिमेलो मार्ग बाजुचे मायक्रो सरफेसिंग पूर्ण केले आहे. या तंत्रज्ञानामुळे रस्त्याचे आयुर्मान सुमारे ४ ते ५ वर्षांनी वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती उपयुक्त ( पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.

बोगद्यातील गळती रोखण्यासाठीचे काम पूर्ण ईस्टर्न फ्रीवेवर चेंबूर आणि पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने असलेल्या बोगद्याच्या आतमध्ये पाणी गळतीच्या समस्येमुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. बोगद्यात सुमारे २०० ते २५० मीटर अंतरापर्यंत पाणी गळती होत असल्याने काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावरही परिणाम झाला होता. त्यामुळे चेंबूर दिशेने तसेच पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने दोन्ही बाजुला पाणी गळती रोखण्यासाठीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये वॉटर प्रुफिंग, ग्राऊटिंग, प्लगिंग यासारखी कामे समाविष्ट होती.

टॅग्स :मुंबई