मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले मात्र १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस लक्षात राहतो असं शरद पवारांनी सांगितले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझ्या जन्मदिवसापेक्षा माझ्या आईचा जन्म दिवस आहे ते लक्षात राहतं. माझ्या आईने अनेक कष्ट केले. शेतात काम करायची, जे पिक येईल ते बाजारात पोहचविण्याचं काम करायची आहे. सामाजिक कामाची तिला आवड होती. अतिशय कष्टाने आम्हाला तिने शिकविलं आणि वाढविले. १९३६ साली ती पहिल्यांदा निवडून आली. महिलांच्यावतीने महिलांसाठी काम करता येते हा आदर्श त्यांनी घालून दिला. मुलींचे शिक्षण, आत्मविश्वासाने मुलींनी पुढे आले पाहिजे हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. अनेक गोष्टी तिच्या सांगण्यासारख्या आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकवेळा यश मिळतं. सन्मान मिळतो, कधीकधी संकटं येत असतात. या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती कोणाकडून येतात याचा विचार मी करतो त्यावेळी २ जण माझ्यासमोर येतात. एक माझी आई अन् दुसरी महाराष्ट्राची जनता असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्या आईचा जन्म १२ डिसेंबरला झाला, बायकोचा जन्म १३ डिसेंबरला झाला तर अनेक मित्र आहेत ज्यांचा जन्म ११ डिसेंबरला झाला आहे. एकेकाळी या देशाची चित्रपटसृष्टी गाजविणारे दिलीप कुमार, ते माझे जवळचे मित्र आहेत. त्यांचाही जन्म ११ डिसेंबरला झाला आहे. त्यामुळे ११, १२, १३ गेले अनेक वर्ष आम्ही खाजगीत कोणाच्या तरी घरी एकत्र जमून एकमेकांचे अभिष्टचिंतन करत असतो असंही शरद पवारांनी बोलताना सांगितले.
त्याचसोबत सत्तेत असताना अनेक धोरणं राबविता येतात. ज्या माणसांसाठी आपण योजना आणतो. त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचतायेत का नाही याची खरं वास्तव सत्तेतून दूर गेल्यावर कळतं. आपली बांधिलकी समाजाशी आहे, तरुण पिढीशी आहे. यांना जोडून घेण्यासाठी काम करा असं मार्गदर्शन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केले.
पाहा व्हिडीओ