स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? तर आपल्याला आपल्या मनाजोगते, भान ठेवत जगता यायला मिळणे म्हणजे स्वातंत्र्य. आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती तिच्या मताप्रमाणे स्वतंत्र विचाराने जगत असली की, आपल्याला तसं जगावं असं वाटतं. मग आपण स्वातंत्र्याच्या संकल्पनांचा विचार करायला लागतो, पण खरंच स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीगणिक वेगवेगळे असू शकते. तेच जाणून घ्यायचा हा प्रयत्न.स्वातंत्र्य म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे वागणे, कसलीही बंधने न लादणे, कोणाच्याही दबावाखाली न येता आपले मत मांडणे, स्वातंत्र्य म्हणजे मानसिक, शारीरिक, आर्थिक, भौगोलिकदृष्ट्या स्वेच्छेने संचार करणे. प्रत्येकाला असे वाटत असते की, आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय हा आपण स्वत: घ्यावा आणि तो क्षण आपल्या मनासारखा जगवा, पण काही गोष्टींमध्ये आपण आपल्या परिस्थितीचा, आई-बाबांचा तसेच समाजाचा विचार करून आपल्या स्वातंत्र्याचा त्याग करतो, पण तरीही स्वातंत्र्य म्हटले की, वेगळाच आनंद आपल्या चेहऱ्यावर झळकतो.- रूपाली केदारी, क्लारास वाणिज्य महाविद्यालय, अंधेरी.स्वातंत्र्य म्हणजे केवळ हेच की, आपल्या पायातील बंधनात्मक बेड्यांचा त्याग करून मोकळ्या आकाशासारख्या स्वछंदांना स्वीकारणे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वातंत्र्य असते, राहण्याचे, शिक्षणाचे, आहाराचे, पेहरावांचे आणि त्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनाचे त्याच्या विचारांचे, पण एखाद्या व्यक्तीने समाजाचा विचार न करता स्वेच्छेने वागले, तर समाज त्याला मान्यता देत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपण स्वतंत्र आहोत की नाही आणि कोणत्या गोष्टींमध्ये आहोत हे ठरविण्याचेदेखील त्याला स्वातंत्र्य नाहीये. समाजाला जरी इंग्रजांकडून स्वातंत्र्य लाभले असले, तरीही आज समाजात विविध वर्ग हा आपल्या हक्कासाठी म्हणजेच आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. काही विशिष्ट वर्ग हा आपल्याला समान हक्क अधिकार मिळावा, म्हणून स्वातंत्र्याचा लढा देताय. आजही स्वातंत्र्याची लढाई ही अपूर्णच आणि आजही आपल्याला दुर्दैवाने असे बोलता येत नाही की, आपण स्वतंत्र आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांनाही स्वतंत्र वावरण्याचा अधिकार आहे, परंतु आजच्या काळात बलात्कार, तसेच स्त्रियांवर होणारे अनेक अत्याचार या कारणांनी अप्रत्यक्षपणे स्त्रियांचे स्वतंत्र त्यांच्यापासून हिसकावून घेतले गेले आहे. समाजात खरी स्वातंत्र्यता तेव्हाच येऊ शकते, जेव्हा समाजातील प्रत्येक घटक हा वैयक्तिकरीत्या, सामाजिकरीत्या, धार्मिकरीत्या, तसेच आर्थिकरीत्या स्वतंत्र असेल.- प्रवीण सुनीता रतन बोरकर,निर्मला निकेतन महाविद्यालय, चर्चगेट.स्वातंत्र्य तर केव्हाच मिळालं होतं, पण मुलींना स्वतंत्रता कधी मिळेल कोणास ठाऊक? मला पण माझे आयुष्य अगदी मनमोकळेपणाने जगायचेय. उठताना-बसताना नजर चोरून नाही ठेवायची. मुलगी आहे म्हणून मन मारून नाही जगायचं. आपल्या समाजाच्या चौकटीत न राहता माझ्या विचारांना स्वतंत्र स्थान मिळवून द्यायचे आहे. मला माझे आयुष्य सुरक्षितरीत्या जगण्याचे स्वातंत्र्य हवंय. मुलींच्या चारित्र्यावर सतत बोट उचलणे कितपत योग्य आहे? चार लोक बघतात म्हणून का गप्प बसायचं. जास्त काही नकोय, फक्त मुलीला माणूस म्हणून जगू द्या.- प्रणाली सावंत,आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणेमाझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वत:चे निर्णय स्वत: घेणे. कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे आर्थिक बाबतीत मी माझ्या पालकांवर अवलंबून आहे, पण माझ्या आई-वडिलांनी मला माझा असा वेगळा दृष्टिकोन बहाल केलाय, ज्यातून मी माझे स्वत:चे निर्णय स्वत: घेते. प्रत्येकाची स्वातंत्र्यतेची व्याख्या ही वेगळी असते. माझ्यासाठी सध्या करिअरच्या संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचे आहे; कारण बºयाचदा पालक आणि मुलांमध्ये करिअरच्या बाबतीत घेतल्या जाणाºया निर्णयामध्ये विरोधाभास जाणवतो, पण माझ्यासाठी मला जे करिअर हवे आहे, ते करण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात, यासाठी मी माझ्या पालकांचे ऋणी आहे.- हर्षाली घोणे,डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले.स्वातंत्र्य म्हणजे आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणे. माझे ध्येय साध्य करण्यासाठी मला कोणतीही बंधने नको आहेत. दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणे, माझ्या तत्त्वात बसत नाही. मी कधीच दुसºयाच्या बोलण्यावरून स्वत:विषयी निर्णय घेत नाही, त्यामुळे मला माझे निर्णय घेण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपल्या विचारांना समाजाच्या चौकटीत न अडकू देता, स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे.- सिद्धेश मांडवे,आंबेडकर महाविद्यालय, वडाळा.माझ्यालेखी स्वातंत्र म्हणजे विचारातील स्वातंत्र. या विचारांनी माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ सापडत जातो व एक माणूस म्हणून त्याचा, त्याच्या विचारांचा विकास होतो. कोणाच्या प्रभावाशिवाय, दबावाशिवाय विचार करणे व ते व्यक्त करणे, हे जेव्हा प्रत्येक मनुष्याकडून होईल, तेव्हा खºया अर्थाने आपण विचाराने स्वतंत्र आहोत, हे म्हणायला हरकत नाही.- अमुल्या शुभांगी प्रवीणकुमार,रुईया महाविद्यालय, माटुंगा.स्वातंत्र्य म्हणजे अशी सामाजिक व राजकीय परिस्थिती, जिथे आपण आपल्या विचारांप्रमाणे वागू शकतो. जोपर्यंत आपल्या वागण्याचा कोणाला त्रास होत नाही, तोपर्यंतच हे वागणं स्वातंत्र्यामध्ये गणले जाते. मग हे आपले हक्क आहे की कर्तव्य? आपल्या विचारांचे आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचे ‘स्वातंत्र्य’ असणे हा आपला हक्क आहे आणि इतरांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे.- राज खंडागळे,बा. ना. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे.१५ आॅगस्ट हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जण तितक्याच अभिमानाने आणि गर्वाने या दिवसाची वाट पाहत असतो. माझ्या देशातल्या थोर पुरुषांनी आणि वीर जवानांनी रक्ताचे पाणी करून भारताला स्वतंत्र केले, पण खरंच हा माझा भारत स्वतंत्र आहे का? आज गेली ७३ वर्षे आपण स्वतंत्र म्हणून जगतोय आणि त्यात वावरतोय, पण तरीसुद्धा या देशात जात-पात, धर्म-पंथ, भेदभाव या गोष्टी सर्वप्रथम विचारात आणल्या जातात. कायद्याची अंमलबजावणी होतच नाही. दडपशाही सोकावली आहे. गुंडगिरी वाढलीय, स्त्रियांना वागण्या-बोलण्याची, शिक्षणाची, हव्या त्या पोशाखात वावरण्याची, कित्येक प्रसंगी तर जगण्याचीच संधी, संमती, नाकारली जात आहे. कोणी म्हणतं अल्पसंख्याकांवर अजूनही अत्याचार होतात, कोणी म्हणतं मतांसाठी अल्पसंख्याकांचेच जास्त लाड होतात. कोणाला खालच्या जाती/धर्माचे असल्याने समान वागणूक मिळत नाही. कोणाला उच्च किंवा प्रगत जातीचे असल्याने आरक्षण मिळत नाही. श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहेत, गरीब जास्त गरीब होत चाललेत. आपला भारत देश तेव्हाच स्वातंत्र्य होईल, जेव्हा देशातले भ्रष्टाचार, स्त्रियांवर होणारे अत्याचार हे संपूर्ण नष्ट होतील आणि प्रत्येक स्त्रीला मातेप्रमाणे आणि बहिणीसमान वागणूक मिळेल आणि प्रत्येक राज्यात स्त्री ही पूर्णपणे सुरक्षित असेल.- विनिता सावंत,भवन्स कॉलेज, अंधेरी.१५ आॅगस्ट, १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला. भारत लोकतांत्रिक देश आहे. या देशात विविधतेमध्ये एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश-भूषा यांची विविधता असतानादेखील सर्व भारतीय आम्ही एक आहोत, हे छातीठोकपणे सांगतो, पण तितक्याच छातीठोकपणे आपण सांगू शकतो का? की माझ्या देशातील प्रत्येक स्त्रीला मान-सन्मानाची वागणूक देईल किंवा तिला योग्य शिक्षणासाठी आणि चांगल्या नोकरीसाठी पाठिंबा देईल. नाही ना? पारतंत्र्यात सामान्य माणसाला सुंदर जीवन, जगण्याचा, शिक्षणाचा आणि स्वातंत्र्य उपभोगायला मनाई होती, पण सद्यस्थितीत स्त्रियांना स्वातंत्र्य असूनदेखील त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. जेव्हा स्त्रियांना या देशात मान-सन्मान मिळेल, तेव्हा खरं स्वातंत्र्य मिळालं, असे म्हणता येईल.- दर्शन भोळे,जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे.भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे पूर्ण होतील. आपण ब्रिटिशांच्या गुलामीतून कायमचे मुक्त झालो, पण इथली स्त्री..! ती स्वतंत्र आहे का? आजही प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या तरी बंधनात अडकली आहे. आपल्या या औद्योगिक आणि कुशल भारतात एकीकडे स्त्रियांना शिक्षण आणि नोकरीचा पूर्ण अधिकार आहे, पण दुसरीकडे याच स्त्रियांना रात्री-अपरात्री घराबाहेर एकटे पडू दिले जात नाही. याचं मूळ कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारे अत्याचार. आपण एका अशा देशात राहतो, जिथे ६ महिन्यांची मुलगी असो किंवा ६० वर्षांची महिला, त्या राक्षसी नजरेतून कोणाचीही गय केली जात नाही. या आपल्याच भारतात ज्याला आपण स्वतंत्र देश समजतो, तिथे शबरीमालासारख्या अनेक पवित्र मंदिरांत स्त्रियांनी प्रवेश करू नये, म्हणून कितीतरी बंधने लादण्यात येतात. आपला भारत तेव्हाच स्वतंत्र्य होईल, जेव्हा इथली प्रत्येक स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित असेल.- शिवानी पाटील,जे. वी. एम मेहता कॉलेज, ऐरोली.(संकलन- समीधा लांजेकर, सायली सावंत, तेजल मोहिते, काजल बच्चे, प्रियांका पावसकर)
जीवनाला अर्थ देणारे स्वातंत्र्य हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 2:20 AM