'त्या' रहिवाशांचा जीव टांगणीला
By admin | Published: June 12, 2016 04:14 AM2016-06-12T04:14:36+5:302016-06-12T04:14:36+5:30
अतिधोकादायक ठरणाऱ्या इमारतींवर पालिका हातोडा टाकत असताना दुसरीकडे डोंगर परिसरात राहणाऱ्या सुमारे लाखभर रहिवाशांना मात्र ठाणे महापालिका आणि वन विभाग दरवर्षी केवळ नोटिसा
ठाणे : अतिधोकादायक ठरणाऱ्या इमारतींवर पालिका हातोडा टाकत असताना दुसरीकडे डोंगर परिसरात राहणाऱ्या सुमारे लाखभर रहिवाशांना मात्र ठाणे महापालिका आणि वन विभाग दरवर्षी केवळ नोटिसा बजावण्याचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून कधी जीव जाईल, याचा नेम नसतानाही लाखभर रहिवासी जीव मुठीत धरून तेथे राहत आहेत.
येथील डोंगरभागात गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनधिकृत वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली. मतांच्या राजकारणासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी या रहिवाशांना अनेक सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे तेथील लोकसंख्या लाखावर पोहोचली आहे. वागळे इस्टेट पट्ट्यातील डोंगराळ परिसराबरोबरच सर्वाधिक अतिक्र मण हे कळवा आणि मुंब्रा परिसरातील डोंगराळ भागात झाले आहे.
कळवा परिसरातील आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, पौंडपाडा असा मोठा डोंगराचा परिसर या झोपड्यांनी व्यापला आहे. तर, मुंब्रा बायपासवर हळूहळू झोपड्यांचे साम्राज्य प्रशासनाच्या डोळ्यांदेखत उभे राहत आहे.
भविष्यात माळीणसारखी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी ठोस कारवाई करण्याऐवजी पालिका आणि वन विभागाने मात्र केवळ नोटीस देण्यातच धन्यता मानली आहे. (प्रतिनिधी)
पालिकेकडे सर्व्हेच नाही
या डोंगराळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे साम्राज्य वाढले असून नेमके किती रहिवासी या परिसरामध्ये राहत आहेत, याचा सर्व्हेच पालिकेने अद्याप केलेला नाही.
पाच वर्षांपूर्वी दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू
पाच वर्षांपूर्वी शीळफाटा येथील रशीद कम्पाउंडजवळ दरड कोसळून ७ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, गेल्या वर्षी कळवा पूर्व येथील आतकोनेश्वरनगर परिसरात घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता.
दरड कोसळू शकते
ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने पावसाळ्यापूर्वी २६ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये रायलादेवी १२, कळवा ६, मुंब्रा ५, मानपाडा १ आणि वर्तकनगर २ अशा ठिकाणांचा समावेश आहे.
डोंगर बनले भुसभुशीत
झोपड्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरला जात असल्याने डोंगरात मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे मातीही भुसभुशीत झाली असून या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे.