अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे नव्हे तर सदोष इनक्युबेटरमुळे घडल्याचे प्राथमिक पाहणी अहवालात म्हटले आहे. इन्क्युबेटरचे तापमान नियंत्रित न झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली, असा निष्कर्ष मंत्रालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात काढण्यात आला आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशुंच्या कक्षाला शनिवारी पहाटे आग लागून त्यात दहा तान्हुल्यांचा वेदनादायी अंत झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने प्राथमिक पाहणी अहवाल तयार केला आहे. त्यात नवजात शिशुंना ज्या इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते तेच सदोष असल्याचे आढळून आले आहे. ज्या इनक्युबेटरचा स्फोट झाला, त्याची थ्री पिन, वायर ज्या स्वीचवर लावण्यात आली होती, ते स्वीच आणि वायरिंग असलेले पाईप जळल्याचे निदर्शनाला आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या इनक्युबेटरचे तापमान नियंत्रित झाले नाही, त्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे त्या इन्क्युबेटरच्या ठिकऱ्या झाल्या. त्यातील लहान शिशूचे अवयवदेखील हाती आले नाहीत. स्फोटामुळे खोलीमध्ये धूर पसरला. दरवाजा बाहेरून बंद होता. तो उघडला गेला नाही आणि धुरामुळे इतर बालके दगावली. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमली आहे. त्यातून आणखी बाबी समोर येतील. मात्र, प्राथमिक पाहणी अहवालाने इनक्युबेटर खरेदीचे वास्तव समोर आणले आहे.
सदोष इनक्युबेटर कोणी खरेदी केले?सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात येणारी विद्युत यंत्रणा याठिकाणी होती. ही घटना घडली तेव्हा मुख्य पॅनेलमधील यंत्रणा ट्रिप झाली, याचा अर्थ विद्युत मांडणीमध्ये दोष नव्हते. भंडाऱ्याच्या हॉस्पिटलला इनक्युबेटर देण्यात आले होते, ते कोणत्या वर्षी, कोणत्या कंपनीकडून घेतले होते? व ही प्रक्रिया कोणत्या अधिकाऱ्यांनी राबवली? याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. चौकशी समितीने याचाही शोध घेतला पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वातानुकूलन यंत्रणा बंदनवजात शिशुंच्या रूमची वातानुकुलित यंत्रणा बंद पडली, त्यात स्फोट झाले, अशी चर्चा सुरू होती. त्यावर अधिकाऱ्याने सांगितले, थंडीचे वातावरण असल्याने नवजात शिशुंकरिता वॉर्मर चालू केले होते. तीन महिन्यांपासून वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. एसीचा वीजपुरवठा एमसीबी बोर्डामधून खंडित करण्यात आला होता. मात्र, तपासणीमध्ये वातानुकूलन यंत्रे जळालेली आढळून आली आहेत. ही यंत्रे बंद असल्यामुळे वातानुकूलन यंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागली नाही, असेही प्राथमिक अहवालात म्हटले आहे.