लहानग्यांचा जीव टांगणीला

By admin | Published: July 13, 2016 03:28 AM2016-07-13T03:28:00+5:302016-07-13T03:28:00+5:30

मालाडच्या नेमाणी हेल्थ सेंटरची दुरुस्ती करणारा कंत्राटदारच पळून गेला. त्यामुळे नेमाणी हेल्थ सेंटरच्या मोडक्या सिलिंगची दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे बालिश उत्तर स्थानिक

Life of a small child | लहानग्यांचा जीव टांगणीला

लहानग्यांचा जीव टांगणीला

Next

मुंबई : मालाडच्या नेमाणी हेल्थ सेंटरची दुरुस्ती करणारा कंत्राटदारच पळून गेला. त्यामुळे नेमाणी हेल्थ सेंटरच्या मोडक्या सिलिंगची दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे बालिश उत्तर स्थानिक नगरसेविकेकडून मंगळवारी देण्यात आले. मात्र त्यांच्या या निष्काळजीपणामुळे शेकडो लहानग्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.
नेमाणी हेल्थ सेंटरचे मोडके सिलिंग गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर कंत्राटदार मिळत नसल्याचे कारण स्थानिक नगरसेविका अनघा म्हात्रे यांनी दिले होते. मात्र त्यानंतर या हेल्थ सेंटरच्या दुरुस्तीचा नारळदेखील फोडण्यात आला. ‘लोकमत’च्या बातमीनंतर म्हात्रे यांनी कंत्राटदार पाठवून डागडुजीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर काम सुरू झालेच नाही. नगरसेविकेने निव्वळ दिखावा केल्याचे नेमाणी हेल्थ सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

नेमाणी हेल्थ सेंटरच्या डागडुजी प्रकरणी पी उत्तर विभागाच्या आरोग्य अधिकारी गुलनार खान यांना संपर्क साधला असता, ‘कंत्राटदार कालच (सोमवार) काम सुरू करणार होता, मात्र त्याचा काही तरी प्रॉब्लेम झाल्याने तो आज (मंगळवार) दुपारी १ वाजता काम सुरू करेल’, असे अभियंता महाजनी यांनी सांगितल्याचे उत्तर त्यांनी ‘लोकमत’ला दिले.
तसेच मी अभियंत्यांच्या मागे लागून हे काम करवून घेईन, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. कंत्राटदार पळून गेल्याचे मला माहीतच नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरच नगरसेवक आणि पालिका प्रशासनाचा एकमेकांशी समन्वय नसल्याने त्याचा दुष्परिणाम निष्पाप मुलांना भोगावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘मी ज्या कंत्राटदाराला काम दिले होते, तो ते काम अर्धवटच टाकून पळून गेला. आता त्याला आम्ही काम दिल्याने तोच हे काम करू शकतो अन्य कोणी नाही’, असे म्हात्रे यांनी उत्तर दिले. या ठिकाणी लस टोचून घेण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांमध्ये नवजात बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अर्धवट मोडक्या स्थितीत असलेल्या या सिलिंगमुळे या मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याची जराही काळजी प्रशासनाला नसल्याचे यातून उघड होत आहे.

Web Title: Life of a small child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.