दोन महिने उपचार घेतल्यानंतर रुग्णाला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:06 AM2021-01-02T04:06:02+5:302021-01-02T04:06:02+5:30
कोरोना संक्रमण : तब्बल ५५ दिवस आयसीयूमध्ये लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड-१९च्या विविध जटिल लक्षणांमधून बाहेर आल्यानंतर ...
कोरोना संक्रमण : तब्बल ५५ दिवस आयसीयूमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९च्या विविध जटिल लक्षणांमधून बाहेर आल्यानंतर जतीन संघवी या ४६ वर्षीय व्यक्तीला नवजीवन मिळाले. मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात विषाणूशी दोन महिन्यांहून अधिक काळ लढा दिल्यानंतर ते रुग्णालयातून बरे झाले आहेत. ते अत्यंत लठ्ठ होते आणि उच्च रक्तदाब, दमा व स्लीप एपनियाचा त्यांना त्रास होता. यामुळे उपचार करणे अत्यंत अवघड झाले होते.
जतीन यांना १५ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात भरती करण्यात आल्यापासून ५५ दिवस आयसीयूमध्ये होते. त्यांच्या शरीरामध्ये पाणी जमा झाले होते आणि त्यांच्या वजनामुळे सीटी स्कॅनदेखील करता आले नाही. याबाबत डॉ. मनीष मवानी आणि डॉ. सुजीत राजन म्हणाले की, तो सहजपणे उपचार करता येणारा रुग्ण नव्हता. त्याच्या वजनामुळे त्याच्या फुप्फुसामध्ये झालेला संसर्ग जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन करू शकलो नाही. रुग्णाची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजन पातळी ६० होती. त्याला ५० दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. फुप्फुसाचे नुकसान कमी करण्यासाठी त्याला विशेष ॲण्टी-फायब्रोटिक औषधे देण्यास सुरुवात केली आणि त्याला १० दिवस रेमडेसिवीर देण्यात आले, तसेच प्लाझ्मा संक्रमणही करण्यात आले होते. संघवीला कोविडच्या लक्षणांमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी औषधोपचार व फिजिओथेरपी सुरू ठेवावी लागणार आहे. त्याचे २० किलो वजन कमी झाल्यामुळे तो खूप आनंदित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.