पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By admin | Published: June 26, 2015 10:47 PM2015-06-26T22:47:20+5:302015-06-26T22:47:20+5:30
मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला परिसरात गुरुवारपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मांडला महाळुंगे,
बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला परिसरात गुरुवारपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मांडला महाळुंगे, काकळघर आदी दहा ते पंधरा आदिवासी गावांचा संपर्क तुटला आहे. बऱ्याच गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
बोर्ली येथील एसटी स्थानकावर जवळपास एक किमीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गटार आहे. हे गटार जिल्हा परिषद गेस्ट हाऊसपासून रायगड जिल्हा बँकेपर्यंत आहे. सदर गटाराची देखभाल ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या गटाराचे बांधकाम सहा ते सात वर्षांपूर्वी करण्यात आले होते. बांधकाम विभागाच्या गटारात काही दुकानदारांनी कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्यामुळे पावसाचे पाणी गटारातून न वाहता तसेच साचल्याने रस्त्यावर येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मुरुड उपविभागाचे उपअभियंता जाधव यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे बोर्ली स्थानकावर फूटभर पाणी साचले असून राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयात पाणी शिरले होते. मुसळधार पावसामुळे गावातील विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. (वार्ताहर)