मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक नेमा, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे मुंबई मनपा आयुक्तांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 02:40 PM2023-06-15T14:40:00+5:302023-06-15T14:40:35+5:30
Neelam Gorhe:
मुंबई - मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत निलम गोऱ्हे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या धर्तीवर शासनाने नागरिकांनी समुद्रात जावू नये असे अर्लट जारी केले असतानाही ही मुले समुद्रकिनाऱ्यावर पोहावयास गेली. या मुलांना महानगरपालिकेच्या जीवरक्षकाने तसेच, समुद्राच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पालिका कर्मचारी यांनी अनुमती नसताना समुद्रात जाण्यास मज्जाव केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी उपरोक्त घटनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, श्री.चहल यांना उपसभापती कार्यालयातून पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी मुलाना समुद्रात जाण्यास जीवरक्षकाने मज्जाव का केला नाही ? , लाटेच्या जवळ जाणाऱ्या मुलाना रोखण्यासाठी कर्मचारी कर्तव्यात का नव्हते ? असे प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, येणाऱ्या पावसाळयामध्ये किनाऱ्यावरती असे प्रकार घडणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात व केलेल्या उपाययोजनाचा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवावा असे पत्रात नमूद केले आहे.