मुंबई : सोमवारी सकाळपासून मुंबईसह ठाण्यात संततधारपणे सुरू असलेल्या पावसाने रात्रीपासून चांगलाच जोर पकडला आणि मंगळवारी सकाळी रेल्वेला दणका दिला. पश्चिम रेल्वेला या पावसाचा मोठा फटका बसला. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने वाणगाव आणि सफाळ्यात रेल्वेरूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे डहाणूकडून चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. विरार ते डहाणू सेवा ही सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या मार्गावरील अहमदाबाद एक्स्प्रेस, सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस, अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस, पोरबंदर एक्स्प्रेस, वापी पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. दुपारी वांद्रे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत होती. या मार्गावरील जवळपास ५0 फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र लोकल फेऱ्या जास्त रद्द झाल्या नाहीत, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. मेन लाइनच्या ठाणे, सायन, माटुंगा स्थानकांच्या रुळांवर पाणी साचले. त्यामुळे सकाळी १० ते सकाळी १0.४0 या वेळेत सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या आणि सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द करण्यात येत होत्या. लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत असल्याने लोकल गाड्यांना प्रचंड गर्र्दी होत होती. जवळपास ६८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. चुनाभट्टी, चेंबूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने हार्बर रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
लाइफलाइन विस्कळीत
By admin | Published: July 22, 2015 1:26 AM