लाईफलाईन पाण्यात; प्रवासी बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:25+5:302021-06-10T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे मुंबईत अत्यावश्यक सेवाच सुरू असल्या तरी लोकलमधून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे मुंबईत अत्यावश्यक सेवाच सुरू असल्या तरी लोकलमधून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बुधवारी मान्सूनचा फटका बसला. तर, मुंबईची आणखी एक लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या बेस्टलाही मान्सूनच्या पाण्यातून कसाबसा प्रवास करावा लागला. मुंबईच्या या दोन्ही लाईफलाईनच कोलमडून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मुंबईत बुधवारी भल्या पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे काही वेळातच रस्ते पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहू लागले. याचा पहिला फटका बसला तो मुंबईच्या लोकलला. कुर्ला ते सायनदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची लोकल सेवा कोलमडली. सायनापासून कुर्ला आणि इतर रेल्वेस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांनी अखेर बेस्ट, टॅक्सी, रिक्षासारख्या पर्यायी वाहनांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रवासही त्यांच्यासाठी दिलासादायक नव्हता, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दादर येथील हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट हे दोन भाग दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाच्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. मुळात आंबेडकर रोड हा मध्य रेल्वेला सायनपर्यंत समांतर असा रोड आहे. मात्र या दोन्ही प्रवासात प्रवाशांना अडथळे आले.
मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला येथील कमानी, शीतल आणि कुर्ला डेपो येथील सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी येथील वाहतूक काही काळ बंद हाेती, तर काही काळ धीम्यागतीने सुरू होती. बुधवारचे सायंकाळचे ५ वाजले तरीही मुंबईत पावसाचा धिंगाणा सुरूच होता.
.................................