जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक, तज्ज्ञांचे मत, प्रदूषणामुळे जीवनमान कमी होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:08 AM2021-09-04T04:08:52+5:302021-09-04T04:08:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिकागो विद्यापीठाच्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्सच्या अहवालानुसार, प्रदूषणाचा आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांबद्दल इशारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिकागो विद्यापीठाच्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्सच्या अहवालानुसार, प्रदूषणाचा आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांबद्दल इशारा देण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे आयुर्मर्यादा कमी होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी मांडला आहे, त्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि जीवनशैलीचा अवलंब करण्यावर अधिकाधिक भर देण्यात यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रत्येक माणूस दिवसाला सरासरी दहा हजार लिटर हवा फुप्फुसात घेतो. यातून एक हजार लिटर ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि पुढे तो रक्तपेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनच्या माध्यमातून रक्तात प्रवास करतो. ऑक्सिजन हा संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असून त्यातून शरीराला ९० टक्के ऊर्जा मिळते आणि केवळ दहा टक्के ऊर्जा आपण दररोज जे जेवण करतो, पाणी पितो त्यातून मिळते. आपल्या जगण्यामध्ये हवा मूलभूत आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते आहे. त्यामुळे श्वसनासाठी रोज शुद्ध हवाच मिळणे हा आपला अधिकार आहे, याकरिता शक्यतो नैसर्गिक जीवनशैली अवलंबवण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा. त्यात निसर्गाच्या कुशीत राहणे, सकस व पौष्टिक आहार, प्लॅस्टिक विरहित जगणे या सवयी अंगी बाळगायला हव्यात असेही डॉक्टरांनी नमूद केले.
दूषित हवेतून उद्भवणारे आजार टाळण्यासाठी आहारातील द्रवपदार्थांचे सेवन, नियमात फलाहार आणि प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या फळ आणि पालेभाज्यांचे सेवन वाढविण्याची गरज आहे. प्रदूषकांना शोषणाऱ्या वृक्षांची लागवड केली पाहिजे. हवेतील प्रदूषके शोषून घेणारी मनी प्लान्ट, अरेका प्लान्ट, बोस्टन फर्न, स्पायडर प्लान्ट अशी छोटी झाडे, झुडपे अथवा वेली देखील घरात लावणे शक्य आहे. हवा प्रदूषण हे संकट आपल्या थेट श्वासाशी संबंधित आहे. ज्या श्वासावर आपले जगणे अवलंबून आहे, त्याचे नियोजन नाही तर आता शुद्ध हवेसाठी काम करण्याची वेळ आली आहे, अशी माहिती श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. किशोर मायंगडे यांनी दिली आहे.
एकत्रित प्रयत्न गरजेचे
हवा प्रदूषण केवळ शरीरावरच नाही तर व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम करत असते. हवा प्रदूषणाचे परिणाम गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्वरित दिसून येतात. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, हवा प्रदूषणाचा परिणाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज जाऊ शकतो. म्हणूनच हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.