कोरोनामुळे जीवनशैलीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:07 AM2020-12-30T04:07:51+5:302020-12-30T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - राज्यासह मुंबईत मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली. त्यानंतर सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात आमूलाग्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - राज्यासह मुंबईत मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली. त्यानंतर सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात आमूलाग्र बदल झाला. कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचे रूपडे पालटले. रोज घड्याळाच्या काट्यावर चालणारा दिवस वर्क फ्रॉम होममध्ये बदलला. या न दिसणा-या विषाणूमुळे सर्वांनाच शारीरिक आरोग्यासह मानसिक स्वास्थ्याकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी दिली.
राज्यात पहिला रुग्ण आढळला
राज्यात ९ मार्च रोजी कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला. दुबईहून परतलेल्या एका दाम्पत्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे प्रथम निदर्शनास आले. दुस-याच दिवशी त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून तीन जणांना लागण झाली असल्याचे आढळून आले. ११ मार्च रोजी, पुण्यातील दाम्पत्याच्या संपर्कात आलेले दोन लोक मुंबईमध्ये कोरोनाबाधित असल्याचे चाचणीमध्ये निदर्शनास आले. याच दिवशी अमेरिकेतून परतलेले पुण्यामध्ये आणखी ३, नागपूरमध्ये १ कोरोनाग्रस्त असल्याचे चाचणीमध्ये स्पष्ट झाले. कोरोनाबाधितांची संख्या ११ वर पोहोचली.
पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू
राज्यात १७ मार्च रोजी पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये ६४ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, २२ मार्च रोजी मुंबईतील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू नोंदवण्यात आला. हा राज्यातील दुसरा मृत्यू होता. त्या दिवशी मुंबईतील सहा आणि पुण्यातील चार अशा १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. २० मार्च रोजी कोरोनाबाधित पाच रुग्ण पूर्णत: बरे होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले.
तात्पुरत्या कोविड केंद्राची उभारणी
मुंबईत कोविड रुग्ण वाढल्यानंतर रुग्णालयातील व्यवस्था अपुरी पडण्याचा धोका संभवत होता. परिणामी, मुंबई महानगरपालिकेने त्वरित हालचाल करून तात्पुरत्या कोरोना केंद्राची उभारणी केली. त्यामुळे शहर, उपनगरांत कोरोना संसर्ग रोखण्यात वरळी एनएससीआय, नेस्को, वांद्रे-कुर्ला संकुल कोरोना केंद्र, महालक्ष्मी कोरोना केंद्र या केंद्रांचे मोठे योगदान आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रणात, धारावी-दादर कोरोनामुक्त
गेल्या १० महिन्यांनंतर आता वर्ष सरताना मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णत: नियंत्रणात आहे. दैनंदिन रुग्णनिदान असो वा मृत्यूसंख्या अत्यंत अल्प प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे, तीव्र संक्रमणाच्या काळात संसर्गाचे मुख्य केंद्र असलेल्या धारावीतही शून्य रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, दादरमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
वैद्यकीय शाखांमध्ये वाद
आयुर्वेद शाखेतील डॉक्टरांना शस्त्रक्रियांना परवानगी दिल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आयुर्वेद शाखांमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर, महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणीकृत असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणीकृत नसलेल्या अन्य कोणत्याही शाखेतील डॉक्टरांसोबत रुग्णांवर उपचार करण्याकरिता मज्जाव करण्यात आलेला आहे. असे आढळल्यास हे वैद्यकीय नीतिनियमांचा भंग असल्याचे मानण्यात येईल, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांना प्रदान केलेल्या अधिकारांना या बेकायदा पत्रामुळे बाधा निर्माण होत आहे, असे मत आयुर्वेदतज्ज्ञांनी मांडले आहे.
वैद्यकीय आस्थापना कायदा प्रलंबितच
राज्यातील ९० टक्क्यांंहून अधिक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. पण, खासगी आरोग्यसेवेचे प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे रुग्णांना ब-याचदा दर्जेदार सेवा सुयोग्य दरात मिळत नाहीत. आतापर्यंत पंजाब, कर्नाटक, हरियाणा, सिक्कीम, मिजोराम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, झारखंड, राजस्थान आदी राज्ये तसेच सर्व केंद्रशासित प्रदेशांत या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रुग्णांची होणारी लूटमार थांबविण्यासाठी राज्यातही या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. मोठमोठ्या खाजगी रुग्णालयांच्या दबावापोटी सरकारकडून मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून या कायद्याच्या नस्तीवर पुढे काहीच झालेले नाही. वैद्यकीय सेवांच्या प्रमाणीकरणासाठी आणि त्याद्वारे या क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी परिणामकारक ठरणा-या वैद्यकीय आस्थापना कायद्याच्या नस्तीवरील धूळ दशकानंतर झटकण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.