पद्मश्री सोनम वांग्याल यांना जीवनगौरव; शिखर सावरकर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:08 AM2021-08-23T04:08:57+5:302021-08-23T04:08:57+5:30
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू केलेल्या शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पद्मश्री सोनम वांंग्याल यांना ...
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू केलेल्या शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पद्मश्री सोनम वांंग्याल यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. शिखर सावरकर जीवनगौरव, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था आणि शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक अशा तीन पुरस्कारांचा समावेश या पुरस्कारांच्या मालिकेत आहे.
स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पद्मश्री सोनम वांग्याल हे भारतीय गिर्यारोहणातील वृद्धापकाळातदेखील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. १९६५ साली भारतीय सैन्यदलाने माऊंट एव्हरेस्टवर अत्यंत रोमांचकारी विजय मिळविला. या पहिल्या विजयी भारतीय पथकाचे सोनाम वंग्याल हे शिखरविजेते सदस्य असून, भारतीय गिर्यारोहण विश्वातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते विख्यात आहेत.
तसेच अन्य दोन पुरस्कारांत शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था यांसाठी रत्नागिरीच्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सना पुरस्कार घोषित झाला आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सनी या वर्षी चिपळूण पूरस्थितीत मोलाचे काम केले आहे. पूर, अपघात अशा दुर्दैवी प्रसंगी या संस्थेचे गेल्या २५ वर्षांतील कार्य म्हणजे साहसाबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून उभारलेला एक आदर्श आहे.
तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कारासाठी सुशांत अणवेकर या नवोदित गिर्यारोहकाची निवड करण्यात आली आहे. सुशांत अणवेकरने विस्तीर्ण पसरलेली सह्याद्रीची उत्तुंग पर्वतमाला पिंजून काढणारी ट्रान्स सह्याद्री ही साहसभ्रमंती मोहीम अत्यंत धैर्य, संयमासह एकट्यानेच पूर्ण केली आहे. या पुरस्कारांची घोषणा सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली. याप्रसंगी कोविड परिस्थितीनुसार लवकरच या पुरस्कारप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर तसेच स्मारकाच्या सदस्या के. सरस्वती यांची उपस्थिती होती.